

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या प्रश्नावर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. पालकांची जबाबदारी, शिक्षणाचे बदलते प्रवाह, विद्यार्थ्यांचे भविष्य, बुद्धिशास्त्रातील विविध संशोधने, शिक्षणाचा मूलभूत अर्थ समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याद़ृष्टीने या निर्देशांचे मोल लक्षात घ्यायला हवे. यापूर्वी सरकारनेही असे निर्देश दिले आहेत; पण त्यांची प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. या वाटांचा प्रवास न करणार्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची गरज आहे.
देशातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेले काही वर्षांत हा आलेख अधिक उंचावत आहे. अशावेळी ही समस्या अधिक विदारक स्वरूप धारण करण्यापूर्वीच गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. कालपर्यंत शेतकर्यांच्या आत्महत्येच्या बातम्या माध्यमात जागा व्यापत होत्या. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या माध्यमात दिसू लागल्या आहेत. यापूर्वी निकालाच्या दरम्यान आत्महत्या घडत होत्या. आता वर्षभरच या बातम्या कानावर पडू लागल्या आहेत. हे सारेच चिंताजनक आहे. ही बुद्धीवान विद्यार्थ्यांची होणारी कोवळी पानगळ भविष्याच्या वाटा अधिक चिंताक्रांत ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे ही समस्या आता केवळ व्यक्तिगत स्वरूपाची राहिलेली नाही. त्यासंदर्भाने संपूर्ण समाजानेच विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या प्रश्नावर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. समस्येचे गांभीर्य लक्षात घेता त्या निर्देशांचे मोल अधिक आहे. त्या निर्देशाचा अधिक गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्याला भविष्यात बरेच काही गमवावे लागण्याचा धोका आहे. देशात आज शारीरिक आजारावर उपचार करण्यासाठी गावोगावी हॉस्पिटल उपलब्ध आहेत. उद्या अशीच स्थिती राहिल्यास आपल्याला मानसिक उपचारासाठी दवाखाने उभे करण्याची वेळ येईल. म्हणून आजच सावध होण्याची गरज आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, शिकवणी वर्गाचा वेळापत्रकासंदर्भाने मर्यांदाचा विचार करण्याची गरज आहे. देशात गेली काही वर्षे शिकवणी वर्गात शिकण्याचे प्रमाण सातत्याने उंचावत आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा विचार करता अनेक महाविद्यालयांनी शिकवणी वर्गासोबत करार केले आहेत. पालकांनादेखील आपला पाल्य महाविद्यालयात नाही गेला तरी चालेल; पण शिकवणी वर्गात प्रवेश घेऊन त्यांना फक्त मार्क हवे आहेत. काही विद्यार्थी महाविद्यालयांबरोबर शिकवणी वर्गालाही हजेरी लावत आहेत. त्यात विद्यार्थ्यांचा मोठा वेळ खर्ची पडत आहे. त्यामुळे मुलांचे शिकण्यावरही परिणाम होत आहे.
अलीकडे आलेल्या विविध सर्वेक्षणांनुसार अगदी प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गात लोटण्याचा प्रयत्न होतो आहे. ते अत्यंत चिंताजनक आहे. या शिकवणी वर्गाचे पेव फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचे मैदानाशी असणारे नाते तुटत चालले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशात स्पष्टपणे म्हटले आहे की, शिकवणी घेणार्या संस्थांनी ठरावीक तासांपेक्षा जास्त शिकवणी घेणे आणि रात्री उशिरापर्यंत शिकवणे टाळावे. यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा अतिरिक्त भार कमी होईल आणि त्यांना पुरेसा आराम मिळेल. मुळात विद्यार्थी पहाटेपासून, तर रात्री उशिरापर्यंत शिकत आहेत; मात्र ते शिक्षणात गुंतल्याने स्वयंअध्ययनास पुरेसा वेळ मिळत नाही. रात्री पुरेशी झोप होत नाही. त्यातून विद्यार्थी तणावात येतात. त्यामुळे अभ्यास केला, तरी त्याचे फलित मिळत नाही. विद्यार्थी नैराश्यात लोटले जातात. त्याचाही गंभीर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे हे निर्देश अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागे पालकांचा दबाव, अपेक्षांचे ओझे हे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकांना आपली मुले म्हणजे, आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणारी व्यवस्थाच वाटू लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमता, कल, अभिरुची लक्षात न घेता त्यांच्यावर बरेच काही लादले जात आहे. त्यातून विद्यार्थी आत्महत्येची वाट चालणे पसंत करत आहेत. अशावेळी पालकांसाठी जाणीव जागृती कार्यक्रमाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. या उपक्रमाची नितांत गरज गेले काही वर्षे अधोरेखित होत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांची पूर्णतः जाणीव असते. आपण काय करू शकतो, आपल्याला काय आवडते, काय केले, तर आपल्याला अधिक मार्क मिळतील, हे माहीत आहे; पण येथे विद्यार्थ्यांना गृहित धरले जाते. पालकच विद्यार्थ्यांचे निर्णय घेत असतात. विद्यार्थी शिकत असताना पालकही तणावात आहेत. शिक्षणाचा अर्थ लक्षात न घेता प्रवास सुरू ठेवल्याने पालकांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे. अशावेळी पालकांसाठी मानसिक आरोग्य, अवास्तव अपेक्षा आणि ताणतणाव यावर पालक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे निर्देशात म्हटले आहे. यामुळे पालकही विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीबद्दल अधिक जागरूक होतील, ही अपेक्षा असल्याचे मत नोंदवले आहे.
या निर्देशांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात निश्चित कार्यरत राहण्यास मदत होईल. आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला, तर विद्यार्थी अधिक प्रगती करतील आणि आनंदाचा आलेखही उंचावलेला अनुभवास येईल. अर्थात, दरवर्षी शाळा, महाविद्यालयात पालक मेळावे होत आहेत; मात्र ते केवळ औपचारिकता ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा शिक्षण व्यवस्थेचा परिणाम आहे, असे म्हटले जात असताना त्यांना आळा घालायचा असेल, तर पालकांसाठीसुद्धा शाळा सुरू असायला हव्यात असे म्हटले जाते आहे.
यामागील भूमिका पालकांची जबाबदारी, शिक्षणाचे बदलते प्रवाह, विद्यार्थ्यांचे भविष्य, बुद्धीशास्त्रातील विविध संशोधने, शिक्षणाचा मूलभूत अर्थ समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या द़ृष्टीने या निर्देशांचे मोल लक्षात घ्यायला हवे. शिक्षणात विषमता ठासून भरली आहे. शिक्षणात समतेचा विचार असण्याची अपेक्षा आहे. शिक्षणातून कोणत्याही स्वरूपाचे वर्गीकरण होता कामा नये, असे म्हटले जाते. शाळांमध्ये असलेल्या तुकड्यांचे विभाजन करताना अधिक मार्क मिळवणारे विद्यार्थी म्हणजे हुशार विद्यार्थी एका वर्गात व कमी हुशार विद्यार्थी एका वर्गात असे विभाजन केले जाते. हे विभाजन विद्यार्थ्यांच्या मनावर अत्यंत विपरीत परिणाम करणारे आहे. त्यातून काही विद्यार्थ्यांच्या कपाळी ‘ढ’चा शिक्का बसतो. त्यातही शिक्षणातील तीव्र स्पर्धा लक्षात घेता पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांना हवी आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली जात आहे.