

वॉशिंग्टन : अंतराळ संशोधकांनी अंतराळात एका अशा तार्याचा शोध लावला आहे, ज्याचा एकदा नव्हे तर दोनदा स्फोट झाला असावा. शास्त्रज्ञांच्या मते, हा विज्ञानाला ज्ञात असलेला पहिला सुपरकिलोनोव्हा असू शकतो. ही घटना म्हणजे एका सुपरनोव्हा आणि दोन न्यूट्रॉन तार्यांच्या विलीनीकरणातून तयार झालेली एक दुर्मीळ युती आहे.
या संशोधनाचा अहवाल ‘अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील ‘एलआयजीओ’ आणि इटलीतील ‘व्हीआयआरजीओ’ या वेधशाळांनी अंतराळातून येणार्या गुरुत्वीय लहरी (ग्रॅव्हिटीशनल व्हेव्ज) टिपल्या होत्या. सुमारे 1.3 अब्ज प्रकाशवर्षे लांब असलेल्या दोन न्यूट्रॉन तार्यांच्या टकरीमुळे या लहरी निर्माण झाल्या होत्या.
यातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या विलीनीकरणातील एका न्यूट्रॉन तार्याचे वस्तुमान (मास) सूर्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले. खगोलशास्त्रानुसार, न्यूट्रॉन तार्याचे वस्तुमान सहसा सूर्याच्या 1.4 पट असते. इतका लहान तारा सापडल्याने शास्त्रज्ञ चक्रावून गेले होते.
सुपरकिलोनोव्हा म्हणजे काय?
कॅलटेकमधील खगोलशास्त्रज्ञ मानसी कासलीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी या घटनेचा सखोल अभ्यास केला. त्यांना असे आढळले की, प्रथम एका विशाल तार्याचा सुपरनोव्हा स्फोट झाला. या स्फोटातून दोन लहान न्यूट्रॉन तारे तयार झाले. हे दोन लहान न्यूट्रॉन तारे पुन्हा एकमेकांवर आदळले आणि त्यातून किलोनोव्हा (ज्यामध्ये सोने आणि प्लॅटिनमसारख्या जड धातूंची निर्मिती होते) तयार झाला. जेव्हा या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी किंवा लागोपाठ घडतात, तेव्हा त्याला सुपरकिलोनोव्हा म्हटले जाते. सुरुवातीला हा प्रकाश किलोनोव्हासारखा लालसर होता; पण नंतर त्यात हायड्रोजनचे अंश दिसले, जे सुपरनोव्हाचे लक्षण आहे.
यासंदर्भात युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचे खगोलशास्त्रज्ञ कोल मिलर म्हणतात, जर हे सत्य असेल, तर आपण विश्वातील अशा वस्तूबद्दल जाणून घेत आहोत जी यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही. मात्र, हे पुरावे पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी आणखी अशा घटनांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. मानसी कासलीवाल यांच्या मते, निसर्गात अशा घटना नेहमी घडत नाहीत. 2017 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची गुरुत्वीय लहरी आणि प्रकाशाची जुळवाजुळव पाहायला मिळाली आहे.