वॉशिंग्टन : ‘सुपरबग’ म्हणजे असे घातक जीवाणू जे औषधांनाही दाद देत नाहीत. अशा जीवाणूंनी अँटीबायोटिक्स औषधांविरुद्ध प्रतिकारक शक्ती विकसित केलेली असते व त्यामुळे ते अतिशय घातक बनतात. हा जगभरातील चिंतेचा विषय बनलेला आहे. ई-कोलीसारखे असे ‘सुपरबग’ औषधांनाही जुमानत नसल्याने त्यांच्या संसर्गावर उपचार करणे कठीण होऊन बसते. आता अशा सुपरबग्जविरुद्ध पुढील प्रभावी औषध विकसित करण्यासाठी ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत होऊ शकते.
नवे अँटीबायोटिक विकसित करण्यासाठी संशोधक अशी जनुके शोधतात, जी जीवाणूंविरुद्ध प्रतिकारकता निर्माण करतात. प्रयोगशाळेतील संशोधनांमधून वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सवर जीवाणू कसे प्रतिक्रिया देतात हे पाहिले जाते तसेच त्यांच्या जनुकीय रचनेतील म्युटेशन्सचे निरीक्षण केले जाते जे त्यांना तग धरून राहण्यासाठी प्रतिकारक शक्ती देतात. ही पद्धत प्रभावी असली तरी वेळखाऊ आहे आणि ती एखाद्या जीवाणूच्या प्रतिकारक शक्तीचे समग्र चित्र दाखवेलच असे नाही. एखाद्या जनुकीय रचनेत म्युटेशन्स म्हणजेच बदल न घडताही प्रतिकारकता निर्माण होते व ती कशी निर्माण होते हे शोधणे कठीण असते. विशेष म्हणजे जीवाणू हे एकमेकांशी असे प्रतिकारक जीवाणूंची देवाणघेवाणही करू शकतात. त्यामुळे एखाद्या स्ट्रेनमधील म्युटेशन्स पाहून त्याचा छडा लावता येत नाही. संशोधकांनी ई. कोलीमधील प्रतिकारक जनुके ओळखण्यासाठी एक नवी पद्धत वापरली. त्यांनी यासाठी कॉम्प्युटर मॉडेलिंगचा वापर केला. त्यामधून त्यांना अशा जनुकांना ‘ब्लॉक’ करण्यासाठी नवी संयुगे डिझाईन करण्याची संधी दिली, जेणेकरून प्रचलित उपचार पद्धती अधिक प्रभावी होईल. त्यासाठी त्यांनी ‘एआय’ म्हणजेच ‘मशिन लर्निंग अल्गोरिदम’चा वापर केला. त्याला नवी जनुके व म्युटेशन्सवर फोकस करण्याचा डेटा देण्यात आला होता.