

नवी दिल्ली : पृथ्वीवर महाविनाश घडवून आणणारे लांब अंतरावरून येणारे धूमकेतू हे सैद्धांतिक ‘ओर्ट क्लाऊड’मधून येतात, असे मानले जाते. ओर्ट क्लाऊड हा सूर्याभोवती १.६ प्रकाशवर्ष अंतरावर पसरलेला बर्फाच्छादित धूमकेतूंचा एक मोठा गोल मेघ (ढग) आहे. मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेचे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड मुलर यांनी एका नव्या सिद्धांतानुसार असा दावा केला आहे की, आपल्या सूर्यमालेत येणारे हे लांब अंतरावरील धूमकेतू केवळ जाणाऱ्या-येणाऱ्या ताऱ्यांमुळे विचलित होत नाहीत, तर ‘नेमेसिस’ नावाच्या एका कमी वस्तुमानाच्या लाल बटू (रेड डॉर्फ) ताऱ्यामुळेही प्रभावित होतात, जो सूर्यासोबतच एका सामायिक गुरुत्वाकर्षण केंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. ओर्ट क्लाऊडभोवती असलेल्या नेमेसिसच्या लंबगोलाकार कक्षेमुळे तो वेळेनुसार अब्जावधी धूमकेतूंना विचलित करतो. जेव्हा नेमेसिस ओर्ट क्लाऊडच्या सर्वात जवळ येतो, तेव्हा धूमकेतूंचा वर्षाव सुरू होतो आणि हा काळ जवळपास दशलक्ष वर्षे टिकू शकतो, असे मुलर यांनी स्पष्ट केले.
नेमेसिस आणि विनाशाचे आवर्तन
हा कोणताही ‘प्लॅनेट एक्स’ किंवा काल्पनिक तारा नाही. मुलर यांच्या मते, ही एक ठरावीक कालावधीत घडणारी घटना आहे, जी पृथ्वीवर दर २५ कोटी वर्षांनी होणाऱ्या आवर्ती विनाशासाठी जबाबदार आहे. १९८२ मध्ये ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार, डायनासोरचा अंत करणाऱ्या ६ कोटी ६० लाख वर्षांपूर्वीच्या के-टी बाऊंड्रीसह इतर महाविनाशांमध्ये २६ दशलक्ष वर्षांचे एक ठरावीक चक्र दिसून येते. मुलर यांच्या मते, दर २६ दशलक्ष वर्षांनी हा सोबती तारा ओर्ट क्लाऊडच्या जवळ येतो आणि पृथ्वीवर धूमकेतूंचा वर्षाव होतो.
आनंद अन् चिंता
या संशोधनातील चांगली बातमी ही आहे की, पृथ्वीला गंभीर नुकसान पोहोचवणारा पुढील धूमकेतूंचा वर्षाव आणखी १२ ते १५ दशलक्ष वर्षांपर्यंत होणार नाही. तर वाईट बातमी अशी आहे की, जर हा तारा अस्तित्वात असेल, तर तो शोधणे खूप कठीण आहे. मात्र, लवकरच सुरू होणाऱ्या ‘रुबिन ऑब्झर्व्हटरीज’मुळे ओर्ट क्लाऊडमधील लांब अंतरावरील धूमकेतूंबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होईल, अशी वैज्ञानिकांना आशा आहे.
नेमेसिस अजूनही का सापडला नाही?
नेमेसिस एक साधा लाल बटू तारा असल्याने तो का दिसत नाही, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र, तो सूर्यासोबतच गुरुत्वाकर्षण केंद्राभोवती फिरत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या दृष्टीरेषेत पुरेशी हालचाल (प्रॉपर मोशन) दिसून येत नाही, ज्यामुळे तो सहज लक्षात येत नाही. तो ओर्ट क्लाऊडला विचलित करू शकेल इतका मोठा असणे आवश्यक आहे, ज्याचा अर्थ तो सूर्याच्या वस्तुमानाच्या कमीत कमी ५ टक्के असावा. तो ८ व्या किंवा ९ व्या तीव्रतेचा अंधुक तारा असल्याने इतर ताऱ्यांच्या गर्दीत शोधणे अत्यंत कठीण आहे.