

ह्युस्टन : एका अंतराळवीराने टिपलेल्या अनोख्या छायाचित्रात, अमेरिकेतील अलाबामा राज्याच्या नावावरून पडलेल्या अलाबामा नदीचे एका सोनेरी, चिनी ड्रॅगनच्या रूपात दिसणारे खास द़ृश्य कॅमेर्यात कैद झाले आहे. या वळणावळणाच्या जलमार्गाला आलेली ही धातूसारखी चमक एका दुर्मीळ ऑप्टिकल घटनेमुळे आहे, जी फक्त अंतराळातूनच पाहता येते.
अलाबामा नदी हा 318 मैल (512 किलोमीटर) लांब जलमार्ग आहे. तो राज्याची राजधानी मॉन्टगोमेरीपासून सुरू होतो, बर्मिंगहॅम आणि सेल्मासारख्या शहरांमधून वाहत जाऊन, मोबाईल खाडीत मिळतो आणि तेथून मेक्सिकोच्या आखातात विलीन होतो. सूर्यप्रकाशामुळे होणार्या सनग्लिंट घटनेमुळे ही नदी अंतराळातून चमकदार ड्रॅगनसारखी दिसून आली. नदीच्या मोठ्या वळणांसह एकत्र पाहिल्यास, जलमार्ग चिनी पौराणिक कथांमधील ड्रॅगनसारखा दिसत असल्याचे नेटिझन्सनी त्यावेळी सांगितले होते.
ड्रॅगनचे डोके (प्रतिमेच्या डाव्या बाजूला) : हे कृत्रिम विलियम ‘बिल’ डॅनेली जलाशयाच्या पूरग्रस्त भागातून तयार झाले आहे. 1960 च्या दशकात नदीवर अर्धवट धरण बांधून हा जलाशय तयार करण्यात आला होता. 27 चौरस मैल (70 चौरस किलोमीटर) आकाराचा हा जलाशय धरणाद्वारे जलविद्युत निर्माण करतो आणि क्रॅपी, बास आणि कॅटफिश मासेमारीसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनला आहे. ‘नासा’च्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार, धरण बांधल्यानंतर नदीची पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त वाढली, ज्यामुळे पाणी आजूबाजूच्या पूरमैदानांमध्ये कायमस्वरूपी पसरले. चिलात्ची खाडीजवळ (जी ड्रॅगनच्या शेपटीच्या वळणाकडे आहे) आणि गीज बेंडच्या आसपास हे पूरग्रस्त भाग तयार झाले.
फोटोमध्ये नदीचा जो भाग दिसत आहे, त्यात गीज बेंड नावाचे मोठे इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण आहे. या वळणाभोवती बोयकिन नावाचे छोटे शहर वसलेले आहे, जे आकर्षक लोककलांसाठी प्रसिद्ध आहे. नदीला आलेली ही असामान्य चमक एका दुर्मीळ घटनेमुळे आहे, ज्याला सनग्लिंट म्हणतात. जेव्हा सूर्याचा प्रकाश स्थिर पाण्याच्या पृष्ठभागावरून अंतराळातील निरीक्षकाकडे (उदा. अंतराळवीर) परिपूर्णपणे परावर्तित होतो, तेव्हा ही घटना घडते. हे एखाद्या महाकाय द्रव आरशासारखे कार्य करते. सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किंवा तलावाच्या पृष्ठभागावर जसे पाणी चमकते, तशीच ही घटना आहे, फरक एवढाच की ती फक्त अंतराळवीरच पाहू शकतात. या सोनेरी ‘सनग्लिंट’मुळे पाणी आणि जमीन यांच्यात चांगला फरक दिसून येतो, ज्यामुळे अनेक पूरग्रस्त भाग हायलाईट होतात.