

अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेल्या वर्षीच्या 5 जूनला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले ‘नासा’चे अंतराळवीर विल्मोर बूच आणि सुनीता विल्यम्स यांना बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानात बिघाड झाल्याने तिथेच तब्बल नऊ महिने मुक्काम ठोकावा लागला. अर्थात दोघेही यापूर्वी अनेक वेळा तिथे जाऊन दीर्घकाळ राहून आलेले असल्याने या काळाचा सदुपयोग करीत त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केले. सुनीताने तर या काळात दोन वेळा स्थानकाबाहेर जाऊन स्पेसवॉक करीत अंतराळ स्थानकाची डागडुजीही केली. आता ‘स्पेस एक्स’च्या ‘ड्रॅगन’ कॅप्सुलमधून हे दोघे अन्य दोन अंतराळवीरांसह पृथ्वीवर सुरक्षित परत आले आहेत. सुनीताच्या या जगाचे लक्ष वेधून घेणार्या अंतराळ प्रवासाची काही वैशिष्ट्ये...
अंतराळवीर दूध पावडर, पिझ्झा, रोस्ट चिकन आणि झिंग्यांचे कॉकटेल खातात. मात्र, मर्यादित प्रमाणात ताज्या अन्नपदार्थांची उपलब्धता असल्याने त्यांच्या आहाराचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. ‘नासा’चे डॉक्टर अंतराळवीरांच्या आहारातील पोषणमूल्ये आणि आवश्यक कॅलरीचे प्रमाण टिकून राहते की नाही यावर सतत लक्ष ठेवत होते.
पॅरिसपासून 400 किमी उंचीवर, शून्य गुरुत्वाकर्षणात सुनीता विल्यम्सने अन्य अंतराळवीरांसह ऑलिम्पिकला शुभेच्छा दिल्या होत्या. एका व्हिडीओत सुनीता ऑलिम्पिक मशालीच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीला पकडून, जिम्नॅस्टिक स्टंट करताना आणि हवेत बॅकफ्लिप मारताना दिसली. इतर अंतराळवीर डिस्कस थ—ो, शॉटपुट आणि वेटलिफ्टिंगचे प्रयोग शून्य गुरुत्वाकर्षणात करताना पाहायला मिळाले.
सुनीता विल्यम्स यांच्या भावजय फाल्गुनी पांड्या यांनी सांगितले की, सुनीता यांनी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याचे सॅटेलाइट फोटो ‘आयएसएस’वरून पाठवले होते. त्यांना अंतराळातून महाकुंभमेळा दिसतो का, असे विचारले असता सुनीता यांनी सांगितले की, ‘हो, अंतराळातून कुंभमेळा स्पष्ट दिसतो!‘ त्यानंतर त्यांनी ही छायाचित्रे पाठवली.
इस्रोचे माजी वैज्ञानिक डॉ. विनोद कुमार श्रीवास्तव यांच्या मते, 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एका कॅनेडियन संशोधनात असे आढळले की, अंतराळात राहिल्याने अंतराळवीरांच्या शरीरातील 50 टक्के लाल रक्तपेशी नष्ट होतात आणि मिशन संपेपर्यंत हा परिणाम होत राहतो. यालाच ‘स्पेस अॅनिमिया’ म्हणतात. अंतराळात प्रत्येक सेकंदाला 30 लाख लाल रक्तपेशी नष्ट होतात, तर पृथ्वीवर हे प्रमाण फक्त 2 लाख पेशी प्रति सेकंद असते. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे शरीर आपोआप रक्तपेशींची भरपाई करू शकते, मात्र अंतराळात ही प्रक्रिया प्रभावित होते. सुनीता व विल्मोर यांनाही ही समस्या असू शकते.
अंतराळात 286 दिवस घालवल्यानंतर सुनीता विल्यम्स सर्वाधिक काळ अंतराळात राहिलेल्या तिसर्या क्रमांकाच्या वैज्ञानिक महिलेच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत. सर्वाधिक काळ ‘आयएसएस’वर राहिलेल्या महिला अंतराळवीरांमध्ये क्रिस्टीना कोच (328 दिवस), पिग्गी वीटसन (289 दिवस), सुनीता विल्यम्स 286 दिवस यांचा समावेश होतो. एकूण सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम : पिग्गी वीटसन (675 दिवस). सर्वाधिक सलग दिवस घालवणारे अंतराळवीर : फ्रँक रुबियो (371 दिवस).
‘बेबी फीट’ ः अंतराळात राहिल्याने तळपायावरील त्वचा विरळ होते आणि नष्ट होते.
समतोल गमावणे ः पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी काही आठवडे लागतात.
चालण्यात अडचण ः गुरुत्वाकर्षण नसल्याने स्नायू कमजोर होतात.
चक्कर आणि दृष्टिदोष ः शरीराची हालचाल पूर्ववत होईपर्यंत असंतुलन जाणवू शकते. ‘नासा’च्या डॉक्टरांच्या मते, अंतराळवीरांनी पृथ्वीवरील वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागतो.