सुनीता विल्यम्स यांनी नवव्यांदा केले स्पेसवॉक

यावेळी अंतराळवीर बुच विल्मोर हेदेखील त्यांच्यासोबत होते
Sunita Williams Completes Her Ninth Spacewalk
सुनीता विल्यम्स यांनी नवव्यांदा केले स्पेसवॉक Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेल्या वर्षी 5 जूनला पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे परतीसाठीच्या यानाच्या समस्येमुळे अद्याप तिथेच आहेत. अर्थात, यापूर्वीही दीर्घकाळ स्थानकावर राहिलेल्या या दोघांचे वैज्ञानिक प्रयोग व अन्य कामे तिथे सुरूच आहेत. सुनीता विल्यम्स यांनी यापूर्वीच्या मोहिमांमध्येही तिथे स्पेसवॉक केले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्थानकाबाहेर पडून आठव्यांदा स्पेसवॉक केले व स्थानकाची डागडुजी केली. आता त्यांनी गुरुवारी संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता अंतराळ स्थानकाबाहेर पडून स्पेसवॉक केला. यावेळी अंतराळवीर बुच विल्मोर हेदेखील त्यांच्यासोबत होते.

सुमारे 5.5 तास चाललेल्या या स्पेसवॉक दरम्यान, ‘आयएसएस’चे बाह्य भाग स्वच्छ करण्यात आले आणि सूक्ष्मजीवांच्या प्रयोगांसाठी नमुने घेण्यात आले. रिपोर्टस्नुसार, यावरून हे स्पष्ट होईल की ‘आयएसएस’वर सूक्ष्मजीव जिवंत आहेत की नाही. याशिवाय तुटलेला अँटेनाही ‘आयएसएस’पासून वेगळा करण्यात आला. सुनीता विल्यम्स यांचा हा 9 वा स्पेसवॉक होता. त्यांनी अंतराळवीर पेगी व्हिटसनचा 60 तास 21 मिनिटांचा विक्रम मोडून सर्वात लांब अंतराळात चालण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत एकूण 62 तास 6 मिनिटे अंतराळात स्पेसवॉक केला आहे. बुच विल्मोर यांचा हा पाचवा स्पेसवॉक आहे. सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसांतील हा दुसरा स्पेसवॉक आहे. त्यांनी 16 जानेवारीला अंतराळवीर निक हेगसोबत साडेसहा तास स्पेसवॉक केला. हे दोन्ही अंतराळवीर 23 जानेवारीला स्पेसवॉक करणार होते, पण त्यांच्या तयारीसाठी हा दिवस 7 दिवसांनी पुढे ढकलण्यात आला. ‘नासा’ने सांगितले की, जर तेथे सूक्ष्मजीव आढळले तर ते अंतराळ वातावरणात कसे टिकून राहतात आणि पुनरुत्पादन करतात हे समजण्यास या प्रयोगामुळे मदत होईल. ते अंतराळात किती अंतरापर्यंत जाऊ शकतात हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. हे सूक्ष्मजीव चंद्र आणि मंगळ यासारख्या ग्रहांवर तग धरू शकतील का, याचाही शोध घेतला जाईल. दरम्यान, ‘नासा’ने गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्यांना मार्च 2025 अखेरची वाट पाहावी लागेल. ही तारीख एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत वाढू शकते. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार, सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परत आणण्यासाठी स्पेसएक्सला नवीन कॅप्सूल तयार करावे लागणार आहे. ते बनवायला वेळ लागेल. त्यामुळे मिशनला विलंब होणार आहे. हे काम मार्चअखेर पूर्ण होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news