

वॉशिंग्टन : आठ दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेली सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर आता पुढील वर्षीच्या फेब—ुवारीपर्यंत म्हणजे आठ महिन्यांसाठी तिथेच राहणार आहे. त्यांना घेऊन जाणार्या बोईंग स्टारलायनर यानातील समस्यांमुळे ही वेळ त्यांच्यावर आली.
आता हे यान रिकामेच पृथ्वीवर परतले असून त्याच्या या परतीच्या प्रवासावेळीही काही समस्या दिसून आल्याने यामधून दोन्ही अंतराळवीर परतले नाहीत, हे चांगलेच झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बूच विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पत्रकार परिषद घेतली. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री 12.15 वाजता सुरू झालेल्या या परिषदेत सुनीता आणि बूच यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अमेरिकेच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार असल्याचे दोघांनी सांगितले.
मतदानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बूच म्हणाले की, आजपासूनच त्यांनी मतदानाशी संबंधित निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपण मतदान कसे करू शकतो यावर नासा काम करत आहे. सुनीता विल्यम्स यांनी सांगितले की, त्या अंतराळातून मतदान करण्याबद्दल उत्साहित आहेत. पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्पेस सेंटरमधून सुनीता आणि बूच यांनी सांगितले की, त्यांनी नासाला अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. सुनीता आणि बूच यांनी 5 जून रोजी स्पेस स्टेशनवर उड्डाण केले. ते 6 जून रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचले. ते 13 जूनला परतणार होते.
पण, नासाच्या बोईंग स्टारलायनर यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले. आता दोघेही 2025 मध्येच परत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनीता आणि बूच यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळ यान 3 महिन्यांनंतर 7 सप्टेंबर रोजी सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले. त्याचे लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने झाले. पत्रकार परिषदेत सुनीता यांनी सांगितले की, आयएसएस हे त्यांच्यासाठी आनंदाचे ठिकाण आहे. गरज पडल्यास, आम्ही येथे 8 महिने, 9 किंवा 10 महिने राहू शकतो. पण, कुटुंब आणि पाळीव कुत्र्यांना मिस करतो. एकाच मोहिमेवर दोन भिन्न अंतराळयान उडवण्यास उत्सुक असल्याचे सुनीताने सांगितले. आम्ही परीक्षक आहोत, ते आमचे काम आहे.
बूच म्हणाले, ते पहाटे साडेचार वाजता उठतात, तर सुनीता साडेसहा वाजता उठतात. अंतराळात राहिल्यामुळे हाडांची घनता कमी होण्यास सामोरे जाण्यासाठी दोघेही दोन तास व्यायाम करतात. बूच म्हणाले की स्टारलायनरचा पहिला चाचणी पायलट म्हणून, त्यांना येथे जास्त वेळ घालवावा लागेल अशी अपेक्षा नव्हती. तथापि, त्यांना माहिती होते की, काही समस्या असू शकतात, ज्यामुळे त्यांच्या परत येण्यास उशीर होऊ शकतो.