

वॉशिंग्टन : जवळपास 10 महिन्यांहून अधिक दिवसांपासून अंतराळात मुक्कामी असणार्या सुनीता विलियम्स यांना यंदाचा ख्रिसमससुद्धा कुटुंबासमवेत साजरा करता आला नाही. असं असलं तरीही भारतीय वंशाच्या या महिला अंतराळवीरानं ख्रिसमसच्या सेलिब्रेशनला मात्र बगल दिलेली नाही. पृथ्वीपासून कैक मैल दूर असणार्या ‘आयएसएस’ अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर विलियम्स, बुच विल्मोर आणि इतर साथीदारांनीही ख्रिसमस सेलिब्रेशन केलं आहे.
नुकताच एक्सच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा असून, त्यामध्ये डॉन पेटिट, निक हेग, बुच विल्मोर, सुनीता विलियम्स हे अंतराळयात्री दिसत आहेत. अंतराळातील हे ख्रिसमस सेलिब्रेशन खर्या अर्थानं खास ठरलं असं म्हणायला हरकत नाही. पृथ्वीवर जिथं नाताळच्या निमित्तानं घातल्या जाणार्या लाल रंगाच्या टोपीचा वरील भाग कायमच लोंबकळत पडतो, तिथं अवकाशात मात्र गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळं टोपीच्या वरील भाग जणू ऐटीत उभा असल्याचं दिसून आलं.
इतकंच नव्हे, तर डोक्यावर एक छानसा हेअरबँड लावून सुनीता विलियम्सही कमाल दिसत होत्या. अंतराळातलं हे सेलिब्रेशन आजूबाजूला उडणार्या, हवेत तरंगणार्या वस्तू पाहताना हे एक प्रकारचं ‘फ्लाईंग सेलिब्रेशन’ होतं असं म्हणायला हरकत नाही. 23 डिसेंबर 2024 रोजी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या माध्यमातून या अंतराळवीरांनी पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीरांना, मित्रपरिवाराला आणि नासाच्या संपूर्ण टीमसह आप्तेष्टांना या खास क्षणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पृथ्वीवरील ख्रिसमस पार्टीची आठवण काढत ही मंडळी आनंद साजरा करताना दिसली.