Summer watermelon superfood | उन्हाळ्यात कलिंगड ठरते ‘सुपरफूड’!

Summer watermelon superfood
Summer watermelon superfood | उन्हाळ्यात कलिंगड ठरते ‘सुपरफूड’!
Published on
Updated on

मुंबई : उन्हाळ्याचा कडाका वाढू लागला की शरीराला थंडावा देणार्‍या फळांची मागणी वाढते. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेले फळ म्हणजे ‘कलिंगड’. लालचुटूक आणि रसाळ कलिंगड केवळ तहान भागवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले आहे.

कलिंगडामध्ये साधारणपणे 92 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ‘डिहायड्रेशन’चा धोका निर्माण होतो. अशा वेळी कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि नैसर्गिक थंडावा मिळतो. कलिंगडामध्ये ‘लायकोपीन’ नावाचे अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.

कलिंगडमधील व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ मुळे त्वचा टवटवीत राहते आणि केसांचे आरोग्यही सुधारते. उन्हामुळे होणारी त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडात असलेल्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामध्ये ‘सिट्रुलिन’ नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते, जे स्नायूंचा थकवा कमी करण्यासाठी आणि व्यायाम करणार्‍या व्यक्तींसाठी ऊर्जा देण्यास मदत करते. आहारतज्ज्ञांच्या मते, कलिंगड नेहमी दिवसा किंवा दुपारी खाणे सर्वात उत्तम असते. रात्री कलिंगड खाणे टाळावे. कारण, त्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो किंवा पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. तसेच, कापलेले कलिंगड जास्त वेळ उघड्यावर न ठेवता ताजे असतानाच खावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news