

लंडन : स्वान्सी विद्यापीठातील संशोधकांनी एक असा कृत्रिम रेणू तयार केला आहे, जो कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो. साखरेचा लेप असलेल्या या नॅनो पार्टिकलने (अतिसूक्ष्म कण) प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये संसर्गाचा दर जवळपास 99% कमी केला आहे. हा शोध कोव्हिड-19 विरुद्धच्या लढाईत एक नवीन आणि प्रभावी शस्त्र ठरू शकतो, ज्यामुळे भविष्यातील अँटिव्हायरल उपचारांना नवी दिशा मिळाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरण आणि औषधोपचार सुरू असताना, स्वान्सी विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील एका आंतरराष्ट्रीय टीमने एक क्रांतिकारक शोध लावला आहे. त्यांनी एक ‘कृत्रिम ग्लायकोसिस्टम’ म्हणजेच साखरेचा लेप दिलेला एक कृत्रिम कण विकसित केला आहे, जो विषाणूसाठी ‘आमिष’ म्हणून काम करतो.
मानवी पेशींच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरीत्या साखरेचे रेणू असतात, ज्यांना ‘पॉलिसायलोसाईड्स’ म्हणतात. कोरोना विषाणूचा स्पाईक प्रोटिन याच साखरेच्या रेणूंना चिकटून पेशींमध्ये प्रवेश करतो आणि संसर्ग पसरवतो. शास्त्रज्ञांनी याच नैसर्गिक रचनेची हुबेहूब नक्कल करणारे कृत्रिम कण तयार केले आहेत.
जेव्हा विषाणू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो खर्या पेशींऐवजी या बनावट साखरेच्या कणांना चिकटतो. यामुळे विषाणू पेशींपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि संसर्ग होण्याचा धोका टळतो. महत्त्वाचे म्हणजे, ही लस नाही, जी प्रतिकारशक्तीला चालना देते, तर विषाणूसाठी एक भौतिक ढाल (फिजिकल शिल्ड) आहे.
या संशोधनात मानवी फुफ्फुसांच्या पेशींवर केलेल्या चाचण्यांमध्ये या कणांमुळे संसर्ग तब्बल 98.6% ने कमी झाल्याचे दिसून आले. हे कण विषाणूच्या स्पाईक प्रोटिनला तब्बल 500 पट अधिक घट्टपणे चिकटतात आणि अत्यंत कमी मात्रेतही प्रभावी ठरतात. विशेष म्हणजे, या कणांनी केवळ मूळ विषाणूच नव्हे, तर अधिक संसर्गजन्य असलेल्या व्हेरियंटलाही यशस्वीपणे रोखले.
या संशोधनाचे नेतृत्व करणार्या स्वान्सी विद्यापीठातील रसायनशास्त्राच्या वरिष्ठ व्याख्याता डॉ. सुमती भाटिया यांनी सांगितले की, हा शोध कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक नवी दिशा देणारा आहे. यातून भविष्यात अँटिव्हायरल उपचारांची एक नवीन श्रेणी विकसित होऊ शकते, ज्यामुळे सर्वात जास्त धोका असलेल्या लोकांना संरक्षण मिळेल.
या यशस्वी चाचण्यांनंतर आता या कणांची अधिक विषाणू प्रकारांवर उच्च-सुरक्षितता असलेल्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली जाईल. या शोधातून भविष्यात अँटिव्हायरल नेझल स्प्रे (नाकातील फवारा), पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर आणि विशेषतः ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा असुरक्षित गटांसाठी प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा शोध कोव्हिड-19 आणि भविष्यातील साथीच्या रोगांविरुद्ध संरक्षणाची एक नवीन भिंत उभी करू शकतो.