Sudan Ancient Discovery : 3,500 वर्षांपूर्वीच्या खेळातील मोहरा बनला सुदानचा ‌‘जादुई‌’ दागिना

प्राचीन संस्कृती आणि कलेचा एक अद्भुत मिलाफ
Sudan Ancient Discovery
3,500 वर्षांपूर्वीच्या खेळातील मोहरा बनला सुदानचा ‌‘जादुई‌’ दागिना
Published on
Updated on

वॉशिंग्टन : 1987 मध्ये ‌‘क्लीव्हलँड म्युझियम ऑफ आर्ट‌’ने एका अत्यंत दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण दागिन्याचा (पेंडंट) संग््राह केला. जांभळ्या रंगाच्या नीलमणी (ॲमिथिस्ट) खड्यावर कोरलेले सिंहाचे तोंड आणि त्यावर बसवलेली सोन्याची नक्षी असलेले हे पेंडंट प्राचीन काळातील कलेचा आणि संस्कृतीचा एक अद्भुत नमुना ठरले आहे. या दागिन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा एक भाग दुसऱ्या भागापेक्षा कित्येक शतके जुना आहे.

संशोधनानुसार, हे सिंहाचे तोंड सुमारे 3,500 वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये एका खेळासाठी लागणारा ‌‘मोहरा‌’ म्हणून घडवण्यात आले होते. ‌‘सेनेट‌’ नावाच्या लोकप्रिय प्राचीन इजिप्शियन खेळात 30 चौकोनांच्या पटावर हलवण्यासाठी अशा प्रकारच्या सिंहाच्या आकाराच्या मोहरांचा वापर केला जात असे. हा मौल्यवान खडा इजिप्तच्या ‌‘न्यू किंगडम‌’ काळातील (इ.स.पूर्व 1550 ते 1070) आहे. मात्र, सुमारे 2,700 वर्षांपूर्वी सुदानमधील एका कारागिराने या जुन्या इजिप्शियन रत्नाला एका नवीन सोन्याच्या चौकटीत बसवले. या चौकटीवर आठ बसलेले बॅबून (एक प्रकारचा वानर) कोरलेले आहेत. अशा प्रकारे, एका खेळाच्या मोहराचे रूपांतर एका जादुई आणि धार्मिक चिन्हात करण्यात आले.

साधारण 3.5 सेंटिमीटर उंच असलेल्या या पेंडंटमध्ये सिंहाच्या हनुवटीखाली एक छिद्र आहे, जेणेकरून ते गळ्यात घालता येईल. प्राचीन नुबियन संस्कृतीमध्ये जुन्या खड्यांच्या कोरीव कामाचे पुनर्चक्रण करण्याची पद्धत प्रचलित होती. नुबियन राजे स्वतःला इजिप्तचे समाट रामेसेस द्वितीय यांचे वारसदार मानत. त्यामुळे आपले इजिप्तशी असलेले संबंध अधोरेखित करण्यासाठी ते अशा मौल्यवान रत्नांना सोन्याच्या नवीन चौकटीत बसवत असत. ही सोन्याची चौकट इ.स.पूर्व 750 ते 300 या नपाटन काळात बनवण्यात आली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. कुशाइट धर्मात सिंह आणि बॅबून या दोन्ही प्राण्यांना पवित्र मानले जाई. सिंह हा ‌‘अमुन‌’ देवाचे प्रतीक मानला जाई, जो राज्याचे रक्षण करणारा आणि सृष्टीचा निर्माता ‌‘अमुन-रा‌’ म्हणून ओळखला जाई. बॅबून हे प्राणी सूर्य आणि चंद्राशी संबंधित मानले जात. या दागिन्यात आठ बॅबून आपले हात वर करून जणू अमुन देवाचे (सिंहाचे) रूप उंचावून धरत असल्याचे दाखवले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा दागिना केवळ अंत्यविधीसाठी किंवा थडग्यात ठेवण्यासाठी नव्हता, तर तो प्रत्यक्ष जीवनात परिधान करण्यासाठी बनवला होता. हा दागिना म्हणजे प्राचीन नुबियन लोकांनी इजिप्शियन वारशाचा वापर करून तयार केलेल्या कलाकुसरीचा एक उत्कृष्ट पुरावा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news