Heart Surgery news | वैद्यकीय क्षेत्रात जागतिक विक्रम! उजव्या बाजूला हृदय असलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

Heart Surgery news |
Heart Surgery news | वैद्यकीय क्षेत्रात जागतिक विक्रम! उजव्या बाजूला हृदय असलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
Published on
Updated on

नवी दिल्ली : वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासात नवी दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयाने एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. शरीरातील सर्व अवयव विरुद्ध दिशेला (आरशातील प्रतिमेप्रमाणे) असलेल्या एका 31 वर्षीय महिलेच्या हृदयावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. अशा प्रकारची मिनिमली इन्व्हेसिव्ह (कमीत कमी छेद देऊन केलेली) शस्त्रक्रिया जगात प्रथमच पार पडल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

काय आहे सिटस् इन्व्हर्सस अवस्था?

राजस्थानमधील या महिला रुग्णाला सिटस् इन्व्हर्सस हा जन्मजात विकार होता. या स्थितीत शरीरातील अंतर्गत अवयवांची रचना सामान्य माणसाच्या उलट असते. या महिलेचे हृदय उजव्या बाजूला, यकृत डाव्या बाजूला, तर प्लीहा आणि जठर उजव्या बाजूला होते. केवळ ही अवस्थाच दुर्मीळ असताना, तिच्या हृदयात छिद्र असल्याची समस्याही समोर आली होती, ज्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचे मिश्रण होत होते.

छातीचे हाड न कापता शस्त्रक्रिया

पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये छातीचे हाड कापले जाते, मात्र डॉ. नरेंद्र सिंग झाझरिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डाव्या स्तनाखाली केवळ 4 सेमीचा छोटा छेद देऊन ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला कार्डिओपल्मोनरी बायपास मशिनवर ठेवण्यात आले होते. हृदयातील छिद्र बुजवण्यासाठी तिच्याच हृदयाच्या आवरणाचा तुकडा पॅच म्हणून वापरण्यात आला.

आरएमएल रुग्णालयाचे सीटीव्हीएस विभागाचे प्रमुख डॉ. झाझरिया यांनी सांगितले की, ‘अशा अवयवांची रचना असलेल्या रुग्णावर सूक्ष्म छेद देऊन केलेली ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे. 30 मार्च रोजी पार पडलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आता धोक्याबाहेर असून तिची प्रकृती वेगाने सुधारत आहे. या यशाने भारतीय डॉक्टरांच्या कौशल्याचा डंका जगभरात वाजला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news