

न्यूयॉर्क : आतापर्यंत प्रायोगिक स्तरावर असणारी फ्लाईंग एअर टॅक्सी आता लवकरच प्रत्यक्षात सेवेत रुजू होईल, असे स्पष्ट संकेत या टॅक्सीच्या यशस्वी उड्डाणामुळे मिळाले आहेत. हायड्रोजनवर चालणार्या या एअरक्राफ्टने टेस्ट फ्लाईटदरम्यान 902 किलोमीटर्सचे विक्रमी अंतर यशस्वीरीत्या कापून काढले. आश्चर्य म्हणजे लँडिंग केले, त्यावेळी या एअर टॅक्सीतील 10 टक्के हायड्रोजन इंधन शिल्लक होते. त्यामुळे, ही एअर टॅक्सी यापेक्षाही अधिक अंतर कापू शकते, हे सुस्पष्ट झाले आहे.
जॉबीजने तयार केलेली ही पहिल्या प्रकारची हायड्रोजन-इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट टॅक्सी असून, ती व्हर्टिकली टेकऑफ करू शकते आणि लँडही करू शकते. टॅक्सीने हवाई प्रवास हा मानवी विकासाचा पुढील टप्पा असून, यावर आणखी संशोधन सुरू आहे, असे जॉबीचे संस्थापक व प्रमुख जोएबेन बेव्हिर्ट यांनी यावेळी स्पष्ट केले. गतवर्षी पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हर्जनवरील एअर टॅक्सीची छोट्या ट्रिपमध्ये चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर हायड्रोजन-इलेक्ट्रिक व्हर्जनकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. या एअर टॅक्सीमुळे मॅनहॅटन ते जेएफके हा प्रवास अवघ्या सात मिनिटांत होऊ शकतो, असे आता स्पष्ट झाले आहे. सध्या रस्ता मार्गाने कार प्रवासासाठी येथे एक तासाचा अवधी लागतो. सॅन फ्रॅन्सिस्को ते सॅन दिएगो, बोस्टन ते बॅल्टिमोर, नॅश्विल्ले ते न्यू ऑर्लियन्स या मार्गावर सध्या हवाई टॅक्सीची सेवा सुरू केली जाईल, असे सध्या सांगण्यात आले आहे. नव्या हायड्रोजन-इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये जॉबीच्या नियमित बॅटरी एअरक्राफ्ट प्रणालीप्रमाणेच एअरफ्रेम व डिझाईनवर भर आहे. मात्र, यात आता लिक्विड हायड्रोजन फ्युएल टँकचा नव्याने समावेश केला गेला आहे. यात 40 किलो लिक्विड हायड्रोजन स्टोअर केले जाऊ शकते. एक पायलट व चार रायडर्सना वाहून नेण्याची याची क्षमता आहे.