निळेशार महासागर कशामुळे होताहेत काळे?
प्लायमाऊथ : समुद्र किंवा महासागर म्हटलं की, डोळ्यासमोर निळेशार पाणी येते. मात्र, एका नवीन संशोधनानुसार गेल्या 20 वर्षांत जगातील 21 टक्क्यांहून अधिक महासागर गडद किंवा काळे झाले आहेत. जगातील 21 टक्के महासागर म्हणजे 75 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ नावाच्या विज्ञान मासिकात प्रकाशित झाले आहे. समुद्रातील प्रकाशाचे गुणधर्म बदलत आहेत, असे प्लायमाऊथ विद्यापीठ आणि प्लायमाऊथ मरीन लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात आढळून आले. सदर प्रकाशाचे गुणधर्म बदलत चालले असल्याने फोटिक झोनची खोली कमी होत आहे. हे असे थर आहेत जिथं सूर्यप्रकाश पोहोचतो आणि 90 टक्के सागरी जीव या थरांमध्ये राहतात, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
या अभ्यासात 2003 ते 2022 पर्यंतचा उपग्रह डेटा आणि मॉडेल्सचा वापर करण्यात आला. सूर्यप्रकाश आणि चांदण्यांमुळे सागरी जीवसृष्टी जिथे टिकून राहते, तिथे ऑप्टिकल झोन असल्याचे उघड झाले. किनारे आणि खुल्या समुद्राचे मोठे क्षेत्र उथळ झाले आहे. आफ्रिकेच्या आकारमानाइतक्या महासागराच्या सुमारे 9 टक्के क्षेत्रफळ असलेल्या या भागात प्रकाश क्षेत्राची खोली 50 मीटरपेक्षा जास्त कमी झाली आहे. त्याचवेळी 2.6 टक्के क्षेत्रात ही घट 100 मीटरपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. शिवाय, समुद्राचा सुमारे 10 टक्के भागही थोडा हलका झाला आहे.
एकंदरीत समुद्र अधिक खोल होण्याची प्रवृत्ती आहे. जगण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि अन्न शोधण्यासाठी प्रकाशावर अवलंबून असलेल्या सागरी प्राण्यांसाठी ही चिंतेची बाब असल्याचे या अभ्यासकांनी म्हटले आहे. प्लायमाऊथ विद्यापीठातील सागरी संवर्धनाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. थॉमस डेव्हिस म्हणाले, ‘आमच्या निकालांवरून असे दिसून येते की, या बदलामुळे महासागर मोठ्या प्रमाणात खोल होत आहे. यामुळे सूर्य आणि चंद्रावर त्यांचं जीवन आणि पुनरुत्पादन अवलंबून असलेल्या प्राण्यांसाठी महासागराचं आकारमान कमी होतं.’

