

न्यूयॉर्क : अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एका सागरी बेटावर महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शार्कचे दात शोधत असताना सुमारे ३,००० ते ४,५०० वर्षे जुने पाषाणी भाल्याचे टोक सापडले आहे. ही प्राचीन कलाकृती सुमारे ६ इंच लांब असून, ती 'लेहाई/कोएन्स-क्रिस्पिन' प्रकारची आहे. तपासणी करणाऱ्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, इतक्या उत्तम स्थितीत असलेले भाल्याचे टोक त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. सध्या हे ऐतिहासिक अवशेष व्हर्जिनियाच्या ऐतिहासिक संसाधन विभागाकडे अभ्यासासाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
मेरी बाल्डविन विद्यापीठाची जीवशास्त्राची विद्यार्थिनी ब्रुकलिन रोल्फ ही वर्गमित्रांसोबत व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या कोस्टल रिसर्च सेंटरच्या एका अभ्यास दौऱ्यावर गेली होती. हवामान खराब असल्यामुळे बोटी बाहेर जाणे अनिश्चित होते, मात्र नंतर मिळालेल्या अवघ्या ३५ ते ४० मिनिटांच्या वेळेत विद्यार्थ्यांनी किनाऱ्यावरफेरी मारली. रोल्फ हिची नजर शार्कच्या दातांवर होती, परंतु यादरम्यान तिला खाडीच्या कडेला पाण्यात एक टोकदार दगड पडलेला दिसला. तिने तो उचलून प्राध्यापकांना दाखवला, ज्यांनी क्षणात तो एक प्राचीन दगडी भाला असल्याचे ओळखले. भरती येण्याची वेळ झाली होती आणि काही वेळातच हे टोक पाण्यात पूर्णपणे गाडले गेले असते, त्यामुळे हा शोध अत्यंत योगायोगाने लागला.
ज्या नैसर्गिक क्षेत्रात हे अवशेष सापडले ते शासनाच्या संरक्षणाखाली येते. नियमांनुसार ही ऐतिहासिक वस्तू राज्याच्या मालकीची असल्याने ती शासनाकडे सुपूर्द करण्यात आली. हजारो वर्षांपूर्वी मानवी हातांनी घडवल्यानंतर प्रथमच या दगडाला मानवी स्पर्श झाला असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. या शोधामुळे प्राचीन मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यास मोठी मदत होणार आहे.