

हजारो वर्षांपासून मानव लाकडाचा वापर करत आला आहे. घरबांधणी, फर्निचर, औजारे तसेच मजबूत संरचना उभारण्यासाठी लाकूड महत्त्वाचे साधन ठरले आहे. मात्र प्रत्येक लाकूड सारखेच मजबूत नसते, हेही तितकेच खरे आहे. लाकडाची खरी ताकद त्याच्या आकारावर किंवा बाहेरील जाडीवर ठरत नाही, तर घनत्व, रेशांची रचना आणि टिकाऊपणा यांवर अवलंबून असते. जगभरात अशी अनेक झाडे आहेत, ज्यांचे लाकूड अत्यंत कठीण, जड आणि दीर्घकाळ टिकणारे असते. जगातील अशाच सर्वाधिक कठीण आणि मजबूत लाकूड देणार्या झाडांची ही माहिती....
‘जगातील सर्वाधिक कठीण लाकडांपैकी एक’ असा ‘ऑस्ट्रेलियन बुलोक’ या झाडाचा उल्लेख केला जातो. हे झाड प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळते. या झाडाचे लाकूड अतिशय सघन असून त्यातील तंतू एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात. लालसर-तपकिरी रंगाचे हे लाकूड ओरखडे, तडे आणि घर्षण यांना जबरदस्त प्रतिकार करते. हे लाकूड इतके मजबूत असते की ते कापणे किंवा कोरीव काम करणेही खूप कठीण जाते.
ऑस्ट्रेलियात उगवणारे आयरनबार्क हे युकॅलिप्टस वृक्षांचे एक प्रकार आहे. कठीण हवामान आणि निकृष्ट जमिनीतही हे झाड सहज वाढते. या लाकडामध्ये नैसर्गिक घटक असतात, जे त्याला कीड, ओलावा आणि कुजण्यापासून संरक्षण देतात. त्यामुळे आयरनबार्क लाकडाचा वापर प्रामुख्याने पूल बांधणी, रेल्वे स्लीपर आणि इतर जड कामांसाठी केला जातो.
दक्षिण अमेरिकेत आढळणारे क्वेब्राचो हे झाड आपल्या विलक्षण कठीण लाकडासाठी प्रसिद्ध आहे. या लाकडाचे घनत्व इतके जास्त असते की ते पाण्यात टाकल्यास चक्क बुडते. गडद लालसर-तपकिरी रंगाचे हे लाकूड प्रचंड दाब आणि वजन सहज सहन करू शकते. याच्या अत्यंत कठीण स्वरूपामुळे याचा वापर विशेषतः औद्योगिक कामांसाठी केला जातो.