

लंडन : देशोदेशींचे कायदे आणि नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असतात. पण, काही देशांमधील कायदे एवढे अजब आणि विचित्र आहेत की, ते वाचून किंवा ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जगभरातील अशाच काही रंजक आणि हास्यास्पद कायद्यांची ही माहिती...
इटलीमधील ट्यूरिन शहरामध्ये पाळीव कुत्र्यांच्या मालकांसाठी एक अत्यंत कडक आणि मजेशीर नियम आहे. येथील कायद्यानुसार, कुत्र्याच्या मालकाने दिवसातून किमान दोन वेळा आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन जाणे बंधनकारक आहे. जर कुत्र्याचा मालक आळशीपणा करून कुत्र्याला बाहेर फिरवायला घेऊन गेला नाही, तर त्याला भारतीय चलनानुसार हजारो रुपयांचा दंड किंवा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. कुत्र्यांचे आरोग्य आणि आनंद जपण्यासाठी हा कायदा केला गेल्याचे सांगितले जाते. स्वच्छता आणि शिस्तीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या सिंगापूरमध्ये १९९२ पासून चुईंगगम आयात करणे आणि विकण्यावर सक्त बंदी आहे.
रस्त्यांची स्वच्छता राखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. विशेष म्हणजे, आजारी पडल्यास किंवा उपचारासाठी डॉक्टरांनी सांगितल्यास औषधी चुईंगगम बाळगण्याची परवानगी आहे, अन्यथा विनाकारण चुईंगगम चघळताना किंवा बाळगताना आढळल्यास मोठा दंड आकारला जाऊ शकतो. जपानमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक अतिशय अनोखा कायदा आहे, ज्याला ‘मेटाबो लॉ’ म्हटले जाते. या कायद्यानुसार, ४० ते ७४ वयोगटातील नागरिकांच्या कंबरेचा घेर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढता कामा नये. जर एखाद्याचे वजन किंवा कंबरेचा घेर या मर्यादेपेक्षा जास्त आढळला, तर सरकारकडून त्यांना अनिवार्य आहारविषयक मार्गदर्शन दिले जाते. नागरिकांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवावे हा यामागील मुख्य उद्देश आहे.