Phobetron Pithecium | बघताच एलियन वाटतो… हात लावताच करंट मारतो!

Phobetron Pithecium |
Phobetron Pithecium | बघताच एलियन वाटतो… हात लावताच करंट मारतो!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : निसर्गात एकाहून एक असे अजब आणि अनोखे जीव आहेत. काही त्यांच्या सौंदर्याने मन मोहून घेतात, पण काही एवढे भीतिदायक असतात की त्यांच्याजवळ जाण्याचीही हिंमत होत नाही. आज आपण अशाच एका जीवाबद्दल, विचित्र किड्याबद्दल जाणून घेणार आहोत, पहिल्यांदा पाहताच तो एखाद्या ‘एलियन’सारखा किंवा ‘स्टारफिश’सारखा दिसतो. पण त्याला हात लावायला गेलात, तर खूपच महागात पडू शकते. जाणून घेऊया या अजब किड्याबद्दल...

या अनोख्या जीवाचे वैज्ञानिक नाव फोबेट्रॉन पिथेसियम (Phobetron pithecium) असे आहे. सामान्यतः याला हॅग मॉथ (Hag Moth) किंवा मंकी स्लग कॅटरपिलर (Monkey Slug Caterpillar) असे म्हणतात. याची अळी एखाद्या कापलेल्या स्टारफिश सारखी किंवा स्लगसारखी दिसते. शरीरातून बाहेर आलेले विचित्र अवयवांमुळे हा जणू दुसऱ्या ग्रहावरील जीवासारखा दिसतो. हा प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील जंगले आणि बागांमध्ये आढळतो. दिसायला अतिशय विचित्र असलेल्या या अळीच्या शरीरावरील बाहेर आलेल्या भागांखाली लहान, पोकळ काटे लपलेले असतात.

एखाद्या माणसाने किंवा शिकारी प्राण्याने त्याला स्पर्श केल्यास हे काटे त्वचेत रुतून विषारी पदार्थ सोडू शकतात. त्यामुळे मधमाशीने डंख मारल्यासारखी किंवा विजेचा सौम्य झटका बसल्यासारखी वेदना होते तसेच तीव्र जळजळ आणि सूज जाणवू शकते. या कीटकाच्या शरीराची विचित्र रचना केवळ शत्रूला घाबरवण्यासाठी नसते, तर ती त्याच्या संरक्षणासाठीही उपयुक्त ठरते. शिकाऱ्याने हल्ला केल्यास शरीराचे स्टारफिशसारखे काही भाग सहज तुटून वेगळे होऊ शकतात. यामुळे शिकाऱ्याचे लक्ष विचलित होऊन अळीला स्वतःचा जीव वाचवण्याची संधी मिळते. ही अळी मोठी झाल्यावर तिचे साधारण तपकिरी रंगाच्या पतंगात रूपांतर होते. त्याचे प्रौढ रूप पाहिले तर, त्याचे सुरुवातीचं रूप किंवा अवस्था याची कल्पनाही करता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news