

नवी दिल्ली : भारताच्या शहरी विकास आणि तांत्रिक प्रगतीची ही एक ऐतिहासिक कथा आहे. आज भारतात अनेक शहरांमध्ये मेट्रो धावत आहे... दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूर; पण तुम्हाला माहीत आहे का, भारताची पहिली अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजेच जमिनीखाली बनवलेल्या भुयारातून धावणारी मेट्रो कुठे तयार झाली? आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.
भारतात पहिल्यांदा भूमिगत भुयारी मेट्रो कोलकाता शहरात बांधली गेली. याच शहरातून भारताच्या मेट्रो प्रवासाची सुरुवात होते. कोलकाता मेट्रोची सुरुवात झाली 24 ऑक्टोबर 1984 रोजी. हाच दिवस भारतात अंडरग््रााऊंड मेट्रो सिस्टीमच्या इतिहासात नोंदवला गेला. पहिली मेट्रो ट्रेन एस्प्लेनेड ते नेताजी भवन स्टेशन दरम्यान धावली. या मार्गाची लांबी सुमारे 3.4 किलोमीटर होती. कोलकाता मेट्रोची योजना 1971 मध्ये तयार झाली होती; पण ती पूर्ण होण्यासाठी 13 वर्षे लागली. कारण, हा भारतातील पहिलाच असा मोठा प्रकल्प होता.
हा प्रकल्प मेट्रो रेल्वे कोलकाताने भारतीय अभियंते आणि सोव्हिएत तज्ज्ञ यांच्या मदतीने साकारला. ही भारतातील पहिली अशी रेल्वे होती, जी जमिनीखालून बांधलेल्या बोगद्यांमधून धावत होती. त्या काळात या तंत्रज्ञानाला भारतात एक चमत्कार मानले गेले. 1986 पर्यंत ती डमडम ते टॉलीगंज पर्यंत पोहोचली. पहिल्यांदाच लोकांना आवाजरहित, वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळाला. कोलकाताच्या लोकांसाठी हा एक गौरवाचा क्षण होता. आज कोलकाता मेट्रो भारताची सर्वात जुनी आणि विश्वासार्ह मेट्रो प्रणाली आहे आणि आता येथे दुसरी भूमिगत भुयारी लाईन देखील तयार झाली आहे. भारताची पहिली भूमिगत भुयारी मेट्रो, कोलकाता (1984), हिने देशात मेट्रो युगाची सुरुवात केली आणि भारताला आधुनिक शहर वाहतुकीचा मार्ग दाखवला.