

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुमारे 6,45,000 पुरुष (वय 20 ते 50 दरम्यान) अॅझोस्पर्मिया या स्थितीने ग्रस्त आहेत. या स्थितीत पुरुषांच्या वीर्यपटलामध्ये शुक्राणूच आढळत नाहीत, ज्यामुळे त्यांना अपत्य प्राप्ती शक्य होत नाही; मात्र आता वैज्ञानिक एक नवीन उपचार पद्धतीची चाचणी करत आहेत, शुक्राणू निर्मिती करणार्या स्टेम सेल्सचे पुनर्प्रत्यारोपण. एका 20 वर्षे वयाच्या तरुणावर त्याचे लहानपणी गोठवलेले स्टेम सेल्स पुन्हा प्रत्यारोपित करण्यात आले. त्याने हाडांच्या कर्करोगासाठी कीमोथेरपी घेण्यापूर्वी हे स्टेम सेल्स म्हणजेच मूळपेशी गोळा करून ठेवले होते.
मूळपेशी या शरीरातील अशा पेशी असतात ज्यांचे रुपांतर कोणत्याही अवयवांच्या पेशीत करता येते. ‘जर ही प्रक्रिया अधिक विकसित झाली आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले, तर ही पुरुषांच्या वंध्यत्वावर एक क्रांतिकारी उपाय ठरू शकते,’ असे डॉ. जस्टिन हौमन, सिडार्स-सिनाय मेडिकल सेंटर येथील यूरोलॉजीचे सहायक प्राध्यापक, यांनी सांगितले. त्यांनी या अभ्यासात थेट सहभाग घेतलेला नाही. हे तंत्र कर्करोगातून बचावलेले, जे वयात येण्यापूर्वी उपचार घेतात किंवा अनुवंशिक तसेच प्राप्त झालेल्या वृषणातील दोषांमुळे वंध्यत्व आलेल्या पुरुषांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते, असेही ते म्हणाले. ही उपचारपद्धत स्पर्मेटोगोनियल स्टेम सेल्सवर आधारित आहे. हे स्टेम सेल्स वृषणामध्ये वयात येण्याच्या आधीच अस्तित्वात असतात आणि किशोरावस्थेत टेस्टोस्टेरॉन वाढल्यावर त्यांचे रुपांतर शुक्राणूमध्ये होते; मात्र काही वैद्यकीय अडथळे, जसे की जननमार्गात अडथळा, अनुवंशिक दोष, हार्मोनल समस्या किंवा कीमोथेरपीसारखे उपचार, हे स्टेम सेल्स नष्ट करू शकतात किंवा त्यांचा शुक्राणू मध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया थांबवतात. जर एखाद्या लहान वयाच्या रुग्णाला भविष्यातील वापरासाठी हे शुक्राणू बनवणारे स्टेम सेल्स जतन करायचे असतील, तर डॉक्टर अल्ट्रासाऊंड मार्गदर्शनाखालील सुईद्वारे वृषणातील ‘रेटी टेस्टिस’ नावाच्या सूक्ष्म नलिकांमधून हे सेल्स गोळा करतात आणि त्यानंतर त्यांना गोठवून ठेवले जाते. पुढील टप्प्यात, हेच जतन केलेले स्टेम सेल्स परत शरीरात त्याच मार्गाने पुन्हा प्रत्यारोपित केले जातात. या प्रक्रियेमध्ये आशा असते की हे सेल्स सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये रोवले जातील आणि तिथेच ते नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे शुक्राणू तयार करू लागतील. अगदी किशोरावस्थेत घडणार्या जैविक प्रक्रियेसारखे. ही पद्धत आधी उंदीर आणि माकडे यांच्यावर यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली होती, जिथे त्यांनी पुढे जाऊन संतती जन्माला घातली. आता पहिल्यांदाच ही पद्धत मानवावर वापरण्यात आली आहे.