

नवी दिल्ली : आर्क्टिक प्रदेशातील थंड पाण्यामध्ये आढळणारा आणि ‘स्टेलर्स सी काऊ’ म्हणून ओळखला जाणारा हा तब्बल 30 फूट लांबीचा सागरी प्राणी त्याच्या चविष्ट मांस आणि जाड चरबीच्या थरामुळे मानवाद्वारे इतक्या वेगाने मारला गेला की, तो अवघ्या काही वर्षांत पृथ्वीवरून कायमचा नामशेष झाला. या शांत आणि महाकाय जीवाचे काही मोजकेच सांगाडे आजही शिल्लक आहेत.
या अवाढव्य सागरी प्राण्याचा शोध 1741 मध्ये लागला. नैसर्गिक शास्त्रज्ञ जॉर्ज विल्हेम स्टेलर हे व्हिटस बेरिंग यांच्या नेतृत्वाखाली सायबेरियातून अमेरिकेकडे सागरी मार्ग शोधण्याच्या मोहिमेवर होते. अलास्काच्या किनार्याहून परतत असताना त्यांचे जहाज बेरिंग बेटावर कोसळले. नोव्हेंबर 1741 रोजी, स्टेलर जेव्हा सरपण शोधत किनार्यावरून चालत होते, तेव्हा त्यांना समुद्रात काही गडद आकृत्या तरंगताना दिसल्या. सुरुवातीला त्यांना ते लाकडी ओंडके वाटले; पण श्वासोच्छ्वास आणि फुत्कार ऐकून त्यांना समजले की, तो अज्ञात सागरी जीवांचा एक मोठा कळप होता. स्टेलर यांनी या प्राण्याला वैज्ञानिकद़ृष्ट्या नोंदवले, ज्यामुळे त्याला त्यांच्याच नावावरून ‘स्टेलर्स सी काऊ’ असे नाव मिळाले. हा प्राणी मॅनटी आणि डुगोंग या सागरी जीवांच्या प्रजातीशी संबंधित होता.
हिमयुगातील महाकाय जीव
हा प्राणी खर्या अर्थाने एक महाकाय होता. पूर्ण वाढलेला सी काऊ सुमारे 30 फूट लांबीचा आणि 10,000 किलो वजनाचा असायचा. सिरेनियन गटातील बहुतेक प्राणी उबदार समुद्रात राहतात. परंतु, स्टेलर्स सी काऊने उत्तरेकडील थंड पाण्याशी जुळवून घेण्यासाठी आपला आकार वाढवला आणि चरबीचा जाड थर विकसित केला. शेवटचे हिमयुग संपल्यानंतर समुद्राची पातळी वाढली. यामुळे या प्राण्यांचे मुख्य खाद्य असलेले केल्पची जंगले तुटली आणि त्यांचे कळप एकमेकांपासून वेगळे पडले, ज्यामुळे त्यांची संख्या आधीच कमी झाली होती.
मानवाच्या हातून झाला स्टेलर्स सी काऊचा अंत :
जेव्हा स्टेलर आणि त्यांच्या साथीदारांनी स्टेलर्स सी काऊ या प्राण्याचे मांस खाल्ले, तेव्हा त्यांना ते अत्यंत चविष्ट आणि पोषक वाटले. तसेच, या प्राण्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नव्हती. या शोधानंतर लगेचच, शिकार्यांनी बेरिंग समुद्रात मोठ्या संख्येने स्टेलर्स सी काऊ शिकार सुरू केली. मांस, जाड चरबी (तेल आणि इंधनासाठी) आणि कातडी यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या झाली. शिकार सुरू झाल्यानंतर अवघ्या 27 वर्षांत (1768 च्या सुमारास) या प्रजातीचे शेवटचे ज्ञात स्टेलर्स सी काऊ मारले गेले आणि हा सागरी प्राणी जगातून पूर्णपणे नामशेष झाला. जॉर्ज स्टेलर यांनी शोधलेला स्टेलर्स सी काऊ हा प्राणी, मानवामुळे इतिहासजमा झालेल्या प्राण्यांच्या सर्वात दुःखद उदाहरणांपैकी एक बनला.