

नवी दिल्ली : ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय मार्शल आर्टपटू विस्पी खराडी यांनी पुन्हा एकदा आपल्या अतुलनीय ताकदीने जगाला चकित केले आहे. त्यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमामध्ये त्यांनी ‘हर्क्युलस पिलर्स चॅलेंज’मध्ये 261 किलो (575.4 पाउंड) वजनाचे खांब यशस्वीरित्या उचलले. हा विक्रम या श्रेणीत कोणत्याही पुरुषाने उचललेले सर्वात जास्त वजन आहे. पंजाबमधील अटारी सीमेवर त्यांनी हा पराक्रम करून दाखवला. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्नुसार, या दोन्ही खांबांचे वजन सुमारे अर्ध्या ध्रुवीय अस्वलाएवढे होते आणि ते 1 मिनिटासाठी उचलून धरायचे होते, पण विस्पी यांनी त्यापेक्षा जास्त वेळ हे वजन उचलून धरले.
त्यांच्या या विक्रमाने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच थक्क केले. हा पराक्रम साजरा करताना, विस्पी खराडी यांनी आपले हे यश भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केले. तसेच, त्यांनी त्यांचे गुरू शिहान आणि हंशी यांचेही त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. हा विस्पी यांचा 17 वा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. यापूर्वी, नोव्हेंबर 2024 मध्ये, त्यांनी 166.7 किलो आणि 168.9 किलो वजनाचे ‘हर्क्युलस पिलर्स’ 2 मिनिटे 10.75 सेकंदांपर्यंत उचलून ठेवण्याचा विक्रम केला होता. याव्यतिरिक्त, विस्पी यांनी अनेक अविश्वसनीय विक्रम नोंदवले आहेत. त्यात एका मिनिटात आपल्या मानेने 21 लोखंडी सळ्या वाकवणे, खिळ्यांच्या अंथरुणावर 528 किलो वजनाची काँक्रिटची स्लैब तोडणे (2022) आणि 2025 मध्ये आपल्या शरीरावर 1,819 किलो वजन (सुमारे एका जिराफच्या वजनाएवढे) सहन करणे यांचा समावेश आहे.