Late night sleep: रात्री उशिरापर्यंत जागणे ठरू शकते हृदयासाठी घातक

नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
Late night sleep
Late night sleepPudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन : काही लोक सकाळी लवकर उठून उत्साहाने कामाला लागतात, तर काहीजणांना रात्रीच्या वेळी जागरण करून जास्त काम करायला आवडते. मात्र, अलीकडील एका मोठ्या संशोधनानुसार, रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे. 28 जानेवारी रोजी ‌‘जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन‌’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, ‌‘क्रोनोटाईप‌’ (म्हणजे व्यक्तीला सकाळी लवकर उठायला आवडते की रात्री उशिरापर्यंत जागायला) आणि हृदयाचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. यूके बायोबँकच्या माध्यमातून 39 ते 74 वयोगटातील सुमारे 3,22,000 प्रौढांच्या आरोग्याचा सलग 14 वर्षे मागोवा घेण्यात आला.

संशोधकांनी सहभागी लोकांचे ‌‘मॉर्निंग‌’, ‌‘इंटरमीडिएट‌’ (मध्यम) आणि ‌‘इव्हनिंग‌’ अशा तीन गटांत वर्गीकरण केले होते. त्यांच्या हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी ‌‘लाईफ्स एसेन्शियल 8‌’ या निकषांचा वापर करण्यात आला. मध्यम स्वरूपाच्या झोपण्याच्या सवयी असलेल्या लोकांच्या तुलनेत, रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांचे हृदय आरोग्य खराब असण्याची शक्यता 79 टक्के जास्त आढळली. या लोकांमध्ये पुढील 14 वर्षांत हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका 16 टक्के अधिक होता. सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदय आरोग्य खराब असण्याचे प्रमाण इतर गटांच्या तुलनेत 5 टक्के कमी दिसून आले.

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांचे आरोग्य खराब असण्यामागे केवळ त्यांची झोपण्याची वेळ कारणीभूत नसून, त्यांची जीवनशैली हा मोठा घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभ्यासात असे आढळले की, रात्री जागणाऱ्या लोकांमध्ये खालील गोष्टींचे प्रमाण अधिक असते. व्यसन : निकोटिनचे (धूमपान) सेवन 54 टक्के जास्त. झोपेची गुणवत्ता : झोपेचा दर्जा 42 टक्के खराब. व्यायाम : शारीरिक हालचाल 19 टक्के कमी. आहार : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी 8 टक्के जास्त. जोखीम वाढवणारे घटक : संशोधकांच्या मते, रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांमध्ये वाढलेल्या हृदयविकाराच्या धोक्यांपैकी सुमारे 75 टक्के जोखीम ही त्यांच्या जीवनशैलीमुळे असते. यामध्ये धूमपान (34 टक्के), अपुरी झोप (14 टक्के), रक्तातील वाढलेली साखर (12 टक्के) आणि आहार व वजन (प्रत्येकी 11 टक्के) यांचा मोठा वाटा आहे.

थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल, तर केवळ झोपण्याची वेळ बदलणे पुरेसे नाही, तर तुमच्या खाण्यापिण्याच्या आणि व्यायामाच्या सवयींकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news