

चेन्नई : कावेरी आणि कोल्लिडम नद्यांच्या मधोमध वसलेल्या बेटावर, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली शहराजवळ एक असे स्थान आहे, ज्याला ‘भूलोकीचे वैकुंठ’ अर्थात पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. हे स्थान म्हणजे श्रीरंगम किंवा श्री रंगनाथस्वामी मंदिर, जे केवळ एक प्रार्थनास्थळ नसून, द्रविडी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि हजारो वर्षांपासून जपलेल्या जिवंत सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. जगातील सर्वात मोठे सक्रिय हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाणारे श्रीरंगम, श्रद्धा आणि इतिहासाच्या धाग्यांनी विणलेले एक अद्भुत वस्त्र आहे. या मंदिराच्या सात तटबंदींच्या परिघातच अख्खे श्रीरंगम गाव वसलेले आहे. याचा अर्थ अख्ख्या गावालाच सामावून घेतलेले हे अतिशय विशाल मंदिर आहे.
श्रीरंगम मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. याचा उल्लेख प्राचीन तमिळ संगम साहित्यातही आढळतो. या मंदिराच्या उभारणीत आणि विस्तारात चोळ, पांड्य, होयसळ आणि विजयनगर साम्राज्यासह अनेक राजवंशांनी योगदान दिले आहे. प्रत्येक राजवंशाने आपल्या काळातील स्थापत्यशैलीची आणि श्रद्धेची छाप या मंदिरावर सोडली, ज्यामुळे हे मंदिर केवळ एका काळात बांधले न जाता, शतकानुशतके विकसित होत गेले. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून, येथे त्यांची शेषनागावर पहुडलेल्या अवस्थेतील मूर्ती ‘रंगनाथ’ म्हणून पूजली जाते.
वैष्णव संप्रदायासाठी हे 108 दिव्यदेशमांपैकी (भगवान विष्णूंची पवित्र स्थाने) पहिले आणि सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. श्रीरंगम मंदिराची रचना एखाद्या शहरासारखी आहे. तब्बल 156 एकर परिसरात पसरलेल्या या मंदिरात सात विशाल तटबंदी (प्राकार) आहेत, ज्या सात लोकांचे किंवा मानवी चेतनेच्या सात स्तरांचे प्रतीक मानल्या जातात. या मंदिराच्या स्थापत्यकलेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
गगनचुंबी गोपुरे : मंदिरात एकूण 21 भव्य गोपुरे (प्रवेशद्वारे) आहेत. यापैकी ‘राजागोपूरम’ हे 236 फूट उंचीचे असून, ते आशियातील सर्वात उंच मंदिर-गोपूरम आहे. या गोपुरावरून संपूर्ण परिसराचे विहंगम द़ृश्य दिसते. हजार खांबी मंडप : मंदिरातील ‘हजार खांबी मंडप’ (आयिरम काल मंडपम) हे स्थापत्यशास्त्राचे एक आश्चर्य मानले जाते. प्रत्यक्षात येथे 953 कोरीव काम केलेले खांब आहेत. प्रत्येक खांबावर घोडेस्वार, पौराणिक प्राणी आणि देवतांच्या प्रतिमा अत्यंत सूक्ष्मतेने कोरलेल्या आहेत. विमान आणि गर्भगृह : मुख्य गर्भगृहावरील सोन्याचा मुलामा दिलेले ‘रंगनाथ विमान’ हे अत्यंत पवित्र मानले जाते. त्याची रचना आणि कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
श्रीरंगम मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ एक ऐतिहासिक स्मारक नाही, तर एक जिवंत आणि चैतन्यमय सांस्कृतिक केंद्र आहे. मंदिराच्या सात तटबंदींच्या आतमध्ये बाजारपेठा, घरे आणि दैनंदिन जीवन आजही सुरू आहे. येथे वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात, ज्यात ‘वैकुंठ एकादशी’ हा सर्वात मोठा उत्सव असतो.