

टोरांटो : कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये एक असा तलाव आहे, जो दर उन्हाळ्यात आपल्या विचित्र आणि सुंदर आकारांमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. स्थानिक ‘नस्यल्क्सिन’ या आदिवासी भाषेत ‘खिलूक लेक’ म्हणून ओळखल्या जाणार्या या तलावाला त्याच्या पृष्ठभागावर उमटणार्या वर्तुळाकार ठिपक्यांमुळे ‘स्पॉटेड लेक’ असे नाव पडले आहे. हा तलाव सोडियम सल्फेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट (ज्याला ‘एप्सम सॉल्ट’देखील म्हणतात) आणि चांदी व टायटॅनियम यांसारख्या दुर्मीळ खनिजांनी समृद्ध आहे.
दरवर्षी वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात जसे तापमान वाढते, तसे या तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होते. पाण्यात विरघळलेली खनिजे खाली साचू लागतात आणि पांढर्या रंगाचा एक जाळीदार थर तयार होतो, जो एखाद्या मोठ्या नक्षीदार रुमालासारखा दिसतो. या पांढर्या थरातील जे गडद ठिपके दिसतात, ते प्रत्यक्षात मिठाच्या पाण्याचे उथळ डोह आहेत. प्रकाशाची तीव—ता, त्याखालील खनिजांची रचना आणि शेवाळाच्या अस्तित्वामुळे या डोहांचा रंग निळा, हिरवा किंवा पिवळा दिसतो.
‘स्पॉटेड लेक’ हा एक सोडा लेक आहे, म्हणजेच येथील पाणी अत्यंत खारट आणि अल्कधर्मी आहे. या तलावाला बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नाही, त्यामुळे बाष्पीभवन ही पाणी बाहेर जाण्याची एकमेव प्रक्रिया आहे. सभोवतालच्या टेकड्यांमधून पावसाचे पाणी तलावात येते, तेव्हा ते सोबत नवीन खनिजे घेऊन येते, ज्यामुळे तलावातील खनिजांची घनता वाढत जाते. भूगर्भशास्त्रज्ञ ओलाफ पिट जेन्किन्स यांनी 1918 मध्ये या तलावाचे वर्णन करताना म्हटले होते की, येथील पाणी अंड्याच्या पांढर्या भागासारखे चिकट आणि जड असून, त्याला एक उग्र वास येतो.
या तलावाचे महत्त्व केवळ भूगर्भीय नसून ऐतिहासिकही आहे : जागतिक महायुद्ध : 1916 पासून पहिल्या महायुद्धादरम्यान दारूगोळा बनवण्यासाठी या तलावातील खनिजांचा वापर करण्यात आला होता. आदिवासी वारसा : स्थानिक आदिवासी समुदायासाठी हा तलाव अत्यंत पवित्र असून, त्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनेक शतकांपासून टिकून आहे. 700 मीटर लांब आणि 250 मीटर रुंद असलेल्या या तलावाचे सौंदर्य पाहण्यासाठी उन्हाळ्याचे महिने सर्वात उत्तम मानले जातात.