

ब्राझिलिया : निसर्गात अनेकदा मोठे प्राणी छोट्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. मात्र, दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमधून एक अत्यंत आश्चर्यकारक आणि उलटी निसर्गसाखळी समोर आली आहे. आपल्या लांब पायांसाठी प्रसिद्ध असलेले आणि कोळी प्रजातीशी साधर्म्य असणारे ‘डॅडी लाँगलेग्स’ (Daddy longlegs / Harvestmen) चक्क स्वतःपेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या जिवंत बेडकांना पकडून खात असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ही घटना जितकी दुर्मीळ मानली जात होती, त्यापेक्षा ती निसर्गात अतिशय जास्त प्रमाणात घडत आहे.
या संशोधनाचे सह-लेखक आणि उरुग्वे येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ द रिपब्लिक’चे जीवशास्त्रज्ञ लुईस फर्नांडो गार्शिया यांनी सांगितले, ‘या प्राण्यांना जिवंत बेडूक खाताना पाहणे आमच्यासाठी पूर्णपणे आश्चर्यकारक होते. ते बेडकांसारख्या प्राण्याला पकडू शकतील, अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती.’ कीटक, कोळी, विंचू आणि गोम यांसारख्या ‘आर्थ्रोपॉड’ समूहातील प्राणी जेव्हा बेडूक, सरडे, वटवाघूळ किंवा पक्ष्यांसारख्या पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची शिकार करतात, तेव्हा वैज्ञानिक जगतात याला एक दुर्मीळ घटना मानले जाते. मात्र, जर्मनीच्या ‘मार्टिन ल्यूथर युनिव्हर्सिटी’चे पर्यावरणतज्ज्ञ जोस वाल्डेझ (जे या संशोधनात सामील नव्हते) यांनी सांगितले की, प्रत्यक्षात अशा प्रकारची शिकार खूप सामान्य आहे, पण त्याची पुरेशी नोंद ठेवली गेलेली नाही.
बेडकांचे शरीर मऊ आणि त्वचा पातळ असल्याने ते अशा शिकारीला सहज बळी पडतात आणि बहुतांश वेळा कोळीच बेडकांची शिकार करतात. २१ एप्रिल रोजी ‘इकोलॉजी अँड इव्होल्युशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या शोधनिबंधात अशा १० घटनांची नोंद करण्यात आली आहे, जिथे डॅडी लाँगलेग्स स्वतःच्या आकाराच्या बेडकांना खात होते. यातील बहुतांश नोंदी इक्वाडोर आणि कोलंबियामधील क्षेत्रीय निरीक्षणातून, जुन्या वैज्ञानिक शोधनिबंधांमधून आणि ‘iNaturalist’ या ‘सिटिझन सायन्स’ प्लॅटफॉर्मवर सामान्य नागरिकांनी अपलोड केलेल्या फोटोंवरून गोळा करण्यात आल्या आहेत.
मोबाईल कॅमेऱ्यांमुळे विज्ञानाला मदत
रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेसचे संवर्धन जीवशास्त्रज्ञ ऑलिव्हियर पॉवेल्स यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आजकाल मोबाईल फोनवर चांगल्या दर्जाचे कॅमेरे उपलब्ध असल्यामुळे, सामान्य नागरिकांना निसर्गातील अशा दुर्मीळ घडामोडी कॅमेऱ्यात कैद करणे सोपे झाले आहे. ‘सिटिझन सायन्स’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामान्य लोक हे फोटो तज्ज्ञांपर्यंत पोहोचवत आहेत, ज्यामुळे विज्ञानाला मोठी मदत होत आहे.’
हे खरे कोळी नाहीत!
जोस वाल्डेझ यांनी स्पष्ट केले की, ‘डॅडी लाँगलेग्स’ किंवा ‘हार्वेस्टमेन’ (Harvestmen) हे तांत्रिकदृष्ट्या खरे कोळी (Spiders) नाहीत. ते अर्कनिड (Arachnid) वर्गात येत असले, तरी त्यांचे साधर्म्य कोळ्यांपेक्षा विंचवांशी जास्त आहे. त्यामुळेच त्यांनी बेडकांची शिकार करणे ही बाब शास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.