

ब्युनोस आयर्स : अंतराळातून घेतलेल्या एका छायाचित्राने सध्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अर्जेंटिनातील ‘लॉस ग्लेशियर्स नॅशनल पार्क’मधील एका बिंदूवर तीन भिन्न जलस्रोत एकमेकांना भेटताना दिसत आहेत. एका बाजूला अवाढव्य ‘पेरिटो मोरेनो’ हिमनदी (ग्लेशियर), दुसर्या बाजूला नितळ निळ्या रंगाचा ‘लॅगो अर्जेंटिनो’ तलाव आणि तिसर्या बाजूला गढूळ हिरव्या रंगाची ‘ब-ाझो रिको’ नदी यांचा हा त्रिवेणी संगम निसर्गाच्या किमयेचा उत्तम नमुना आहे.
नासाच्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये एक विशेष गोष्ट लक्षात येते. लॅगो अर्जेंटिनो आणि ब-ाझो रिको या दोन्ही जलाशयांचे पाणी एकमेकांच्या संपर्कात असूनही ते सहज मिसळत नाही. 2022 च्या एका अभ्यासानुसार, या दोन्ही जलाशयांच्या पाण्यातील कणांचे प्रमाण वेगवेगळे असल्याने त्यांची घनता भिन्न आहे. त्यामुळे त्यांचे रंग आणि अस्तित्व वेगळे स्पष्टपणे दिसून येते. पेरिटो मोरेनो ही हिमनदी दर 4 ते 5 वर्षांनी पुढे सरकते आणि मगॅलेनेस द्वीपकल्पाला जाऊन धडकते. यामुळे ब-ाझो रिको नदीचा प्रवाह तात्पुरता अडवला जातो आणि बर्फाचे एक नैसर्गिक धरण तयार होते.
या प्रक्रियेमुळे नदीच्या पाण्याची पातळी 100 फुटांपर्यंत वाढते. जेव्हा पाण्याचा दाब असह्य होतो, तेव्हा हे बर्फाचे धरण अत्यंत थरारक पद्धतीने फुटते, जे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक तिथे गर्दी करतात. पेरिटो मोरेनो हे पॅटागोनिया भागातील सर्वात मोठे ग्लेशियर आहे. याची लांबी साधारण 30 किलोमीटर असून बर्फाचा थर 200 फूट जाड आहे. जागतिक तापमान वाढीमुळे जगातील बहुतांश हिमनद्या वितळत असताना, पेरिटो मोरेनो हे ‘नॉन-रिट्रीटिंंग’ (मागे न सरकणारे) ग्लेशियर म्हणून ओळखले जाते. म्हणजेच हवामान बदलाचा यावर अद्याप मोठा परिणाम झालेला नव्हता. मात्र, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही हिमनदी देखील आता हळूहळू रोडावू लागल्याचे संकेत मिळाले आहेत.