Astronaut moon mission | चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांच्या बुटासाठीही मोठी तयारी

Astronaut moon mission |
Astronaut moon mission | चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांच्या बुटासाठीही मोठी तयारी
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांच्या आधुनिक बुटांचं डिझाईन तयार करण्यासाठी, ते कोणत्या साहित्य किंवा वस्तूपासून तयार करायचे, यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी नासा आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदार कंपन्यांनी अनेक वर्षे काम केलं आहे. ‘नासा’च्या आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राला दुरून प्रदक्षिणा घातली. त्यावेळेस त्यांना चंद्राचा पृष्ठभाग अंतराळातून पाहता आला होता. त्यांना पाहायला मिळालेला चंद्राचा सर्वात जवळचा पृष्ठभाग 4 हजार 67 मैल (6 हजार 545 कि.मी.) अंतरावर होता. मात्र, भविष्यातील चांद्रमोहिमांमध्ये अंतराळवीरांना चंद्राच्या धुळीनं आच्छादलेल्या पृष्ठभागावर उतरवण्यात येईल. चंद्रावर 2028 मध्ये जाण्याची अपेक्षा असलेल्या आर्टेमिस-4 मोहिमेतील 2 अंतराळवीरांची बुटांबाबतची आवश्यकता वेगळी असणार आहे. या अंतराळवीरांना आरामदायी आणि सुरक्षित राहण्यासाठी, अपोलो मोहिमेत वापरलेल्या बुटांपेक्षा अधिक चांगल्या आणि आधुनिक बुटांची आवश्यकता असेल.

चंद्रावर अंतराळवीरांचं उणे 225 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात दीर्घकाळ संरक्षण होणं आवश्यक असेल. तसेच, चंद्राच्या दक्षिण ध—ुवावरील धूळ आणि मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या भूभागावर त्यांना स्थिर ठेवावं लागेल. यासाठी हे नवीन, आधुनिक बूट आवश्यक ठरतील. हे बूट तयार करण्यासाठी इंजिनिअर्स नावीन्यपूर्ण साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्याचबरोबर ते आता चंद्राच्या पृष्ठभागावर हजारो वर्षे राहणार्‍या पाऊलखुणांकडेही लक्ष देत आहेत. चांद्रमोहिमेत वापरल्या जाणार्‍या या बुटांच्या सोल किंवा तळांची चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेशी पकड असणं आवश्यक तर आहेच. त्याचबरोबर चंद्रावर गेलेल्या पहिल्या अंतराळवीरांनी मागे सोडलेल्या पाऊलखुणांप्रमाणेच या नवीन बुटांच्या खुणादेखील चटकन लक्षात येण्यासारख्या असतील. ‘या बुटांमध्ये निश्चितच वापरासंदर्भातील काही वैशिष्ट्यांचा समावेश करावा लागेल,’ असं झॅक फेस्टर म्हणाले. ते नासा जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये सूट (अंतराळवीरांचे कपडे) इंजिनिअर आहेत.

चंद्रावर वापरायच्या नव्या बुटांच्या संशोधन आणि विकास प्रकल्पाचं ते नेतृत्व करत आहेत. ते म्हणतात, ‘यात बुटांची पकड अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या बुटाच्या तळाचा संपर्क वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांशी येत असतो. त्यामुळे या बुटांची कठीण खडक आणि भुसभुशीत धूळ असलेले पृष्ठभाग यावर उत्तम पकड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहनं, शिड्या आणि रोव्हर्ससारख्या कठीण धातूच्या पृष्ठभागांवरदेखील त्यांची चांगली पकड असणं आवश्यक आहे. चालताना होणारी झीज किंवा फाटणं यासारख्या गोष्टींच्या बाबतीतदेखील हे बूट मजबूत असायला हवेत. त्याचबरोबर हे बूट चांगलेही दिसले पाहिजे. कारण, या पाऊलखुणांचे फोटो खूपच मानाचे, प्रतिष्ठित आहेत.’ चंद्रावर 1969 ते 1972 या कालावधीत 12 अंतराळवीरांनी पाऊल ठेवलं होतं. या अंतराळवीरांच्या शेकडो पाऊलखुणा तिथे उमटल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news