

मॅड्रिड : स्पेनमध्ये असा एक भव्य तलाव आहे, जो ३०० मीटरपेक्षा जास्त खोल असल्यामुळे त्यात फ्रान्सचा प्रसिद्ध आयफेल टॉवर सहज आणि पूर्णपणे सामावू शकतो. या तलावाचा विस्तार जवळपास १,६०० अमेरिकन फुटबॉल मैदानांच्या बरोबरीचा आहे. सर्वात मनोरंजक बाब म्हणजे हा कोणताही नैसर्गिक तलाव नसून एका अनोख्या प्रयोगातून साकारलेला कृत्रिम तलाव आहे. उत्तर-पश्चिम स्पेनमध्ये तब्बल ६० वर्षे चाललेल्या कोळसा उपशामुळे एक अवाढव्य खड्डा तयार झाला होता. २००८ मध्ये जेव्हा अभियंत्यांनी हा खोल आणि प्रचंड मोठा खड्डा पाहिला, तेव्हा त्यांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी हा खड्डा पाण्याने भरण्यास सुरुवात केली आणि अवघ्या चार वर्षांत तो पूर्णपणे भरून एका नयनरम्य तलावात रूपांतरित झाला.
‘बोलेटीन जिओलॉजिको वाय मिनरो’ या नियतकालिकात २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘एन्व्हायर्नमेंटल रिकव्हरी ऑफ ॲस पोंटेस माईन पिट लेक’ या इंजिनिअरिंग अभ्यासानुसार, या खड्ड्यात सुमारे ५४७ अब्ज लिटर पाणी साचले आहे. चार वर्षांच्या अविरत प्रयत्नांनंतर स्पेनला देशातील सर्वात मोठ्या कृत्रिम तलावांपैकी एक सुंदर तलाव मिळाला. १९४० च्या दशकात स्पेनमधील एका सरकारी कंपनीने गॅलिसिया येथील ‘ॲस पोंटेस’जवळ लिग्नाईट (तपकिरी कोळसा) काढण्यास सुरुवात केली होती. १९७२ पर्यंत ही खाण आणि त्याशेजारील पॉवर प्लांटची मालकी स्पेनची प्रमुख वीज कंपनी ‘अेंडेसा’ कडे आली. उद्योगाच्या नोंदींनुसार, त्या काळात हा प्लांट स्पेनमधील कोळशावर चालणारा सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प होता.
सहा दशकांच्या काळात कामगारांनी या ठिकाणाहून तब्बल २६० दशलक्ष टन लिग्नाईट बाहेर काढले. सततच्या उत्खननामुळे येथे ३०० मीटरपेक्षा जास्त खोल खड्डा तयार झाला होता. लिग्नाईटला ‘तपकिरी कोळसा’ (Brown Coal) म्हटले जाते, कारण हा कोळशाचा सर्वात नवीन आणि कमी उर्जा देणारा प्रकार आहे. ॲन्थ्रासाईट किंवा बिटुमिनस सारख्या कडक कोळशाच्या तुलनेत हा कमी उष्णता आणि दाबाखाली तसेच कमी भूगर्भीय वेळेत तयार होतो. लिग्नाईटचे साठे सहसा जमिनीच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे ते जमिनीखाली बोगदे बनवून काढण्याऐवजी उघड्या खाणींमधून बाहेर काढले जातात. ॲस पोंटेसमध्येही हेच करण्यात आले. दरम्यान, २००७ मध्ये युरोपियन युनियनने वायू प्रदूषणाचे कडक नियम लागू केल्यानंतर ही खाण अखेर बंद करण्यात आली. त्यानंतर या ओसाड खड्ड्याचे रूपांतर आता अशा एका विस्तीर्ण आणि विलोभनीय तलावात करण्यात आले आहे.