

वॉशिंग्टन : एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच स्टारशिप रॉकेटचा संपर्क तुटला आणि त्याचा स्फोट होऊन तुकडे झाले. स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटला अवघ्या दोन महिन्यांत दुसर्यांदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी जानेवारीमध्येही प्रक्षेपण असफल ठरले होते आणि त्या वेळी रॉकेटचे जळते तुकडे टर्क्स आणि कैकोस बेटांवर कोसळले होते.
स्पेसएक्सच्या थेट प्रक्षेपणात हे स्पष्टपणे दिसून आले की, रॉकेटचे इंजन कटऑफ झाल्यानंतर ते अनियंत्रित फिरू लागले आणि नंतर दक्षिण फ्लोरिडा आणि बहामासच्या आकाशात जळत असलेले तुकडे दिसू लागले. स्पेसएक्सच्या माहितीनुसार, प्रक्षेपणानंतर स्टारशिपचे इंजिन अचानक बंद झाले आणि रॉकेट अनियंत्रित होऊन फिरू लागले. व्हिडीओंमध्ये दक्षिण फ्लोरिडा आणि बहामासच्या आकाशात आगीचे मोठे गोळे खाली पडताना दिसले. या घटनेमुळे मियामी, फोर्ट लॉडरडेल, पाम बीच आणि ऑरलँडो येथील विमानतळांवर रात्री 8 वाजेपर्यंत ग्राऊंड स्टॉप (विमानांचे उड्डाण थांबवणे) लागू करण्यात आले. स्पेसएक्सने अपयशावर भाष्य करताना म्हटले, ‘स्टारशिपच्या उड्डाणादरम्यान अनपेक्षित घटना घडल्या आणि आमचा संपर्क तुटला. आम्ही या चाचणीचे डेटा पुनरावलोकन करून मुख्य कारण समजून घेण्याचा प्रयत्न करू.’ तथापि, कंपनीने सकारात्मक द़ृष्टिकोन कायम ठेवत म्हटले, ‘नेहमीप्रमाणे, आजच्या उड्डाणानेही आम्हाला स्टारशिपच्या विश्वासार्हतेत सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त धडे दिले.’ स्पेसएक्सने एक नकली उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी स्टारशिपचे हे चाचणी उड्डाण केले. 403 फूट (123 मीटर) उंच हे रॉकेट टेक्सासमधून प्रक्षेपित करण्यात आले होते. मात्र, हिंद महासागरावरून पुढे जात असताना रॉकेटचा नियंत्रण केंद्राशी असलेला संपर्क तुटला आणि काही वेळातच ते अनियंत्रित फिरू लागले व आकाशात स्फोट झाला.