

वॉशिंग्टन : स्पेसएक्सने आपल्या स्टारलिंक इंटरनेट नेटवर्कला अधिक मजबूत करत गुरुवारी रात्री (12 जून) 26 नवीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण कॅलिफोर्नियातील व्हँडनबर्ग स्पेस फोर्स बेसच्या लाँच कॉम्प्लेक्स 4 ईस्ट ( SLC-4 E) येथून भारतीय वेळेनुसार 13 जून रोजी सकाळी 6.24 वाजता पार पडले. हे सर्व उपग्रह प्रक्षेपणाच्या सुमारे एक तास एक मिनिटाच्या आत रॉकेटच्या दुसर्या टप्प्यापासून कक्षेत तैनात केले गेले.
या यशस्वी प्रक्षेपणामुळे स्टारलिंकच्या सक्रिय उपग्रहांची एकूण संख्या आता 7,600 पेक्षा अधिक झाली आहे. या मोहिमेत स्पेसएक्सने आपल्या पहिल्या टप्प्यातील बूस्टर B1081 चा वापर केला, ज्याने यापूर्वीच 14 वेळा उड्डाण केले होते. हे बूस्टर दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनार्यापासून दूर प्रशांत महासागरात तैनात असलेल्या ‘ऑफ कोर्स आय स्टील लव्ह यू’ नावाच्या ड्रोनशिपवर यशस्वीरीत्या उतरले.
फाल्कन 9 बूस्टर्सना वारंवार उडवण्याचा स्पेसएक्सचा विक्रम आता 28 वेळा पोहोचला आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रक्षेपण कार्यक्षमतेचीही पुष्टी होते. ही फाल्कन 9 ची 72 वी प्रक्षेपण मोहीम होती, त्यापैकी 53 केवळ स्टारलिंक मोहिमांसाठी होत्या. स्टारलिंक नेटवर्कचा उद्देश जगभरात, विशेषतः दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट प्रदान करणे आहे. अलीकडेच, यातील काही उपग्रह थेट मोबाईल फोनवर टेक्स्टिंग आणि मर्यादित डेटा कनेक्शनची सेवादेखील देऊ लागले आहेत, जे निवडक नेटवर्क प्रदाते आणि स्मार्टफोनसोबत काम करतात.
एलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी सातत्याने अधिक उपग्रह प्रक्षेपित करून नेटवर्कची व्याप्ती आणि विश्वासार्ह सेवा वाढवत आहे. यामुळे लहान सॅटेलाईट डिश आणि मोबाईल फोनदेखील अनेक देशांमध्ये रिअल-टाईम इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकत आहेत. स्पेसएक्स केवळ इंटरनेट उपलब्धतेचा विस्तार करत नाही, तर उड्डाणादरम्यान इंटरनेट आणि आपत्कालीन संवाद समाधानांसारख्या पुढील पिढीच्या सेवांचा पायादेखील रचत आहे. 7,600 पेक्षा जास्त उपग्रह आधीच पृथ्वीच्या कक्षेत सक्रिय आहेत आणि येत्या काळात आणखी अनेक प्रक्षेपणे प्रस्तावित आहेत.