वॉशिंग्टन : भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने 2017 मध्ये श्रीहरिकोटा येथून एकाच रॉकेटच्या सहाय्याने 104 सॅटेलाईट्स म्हणजेच कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडले होते. त्यावेळी हा एक विक्रमच बनला होता. असा विक्रम त्यापूर्वी रशियाच्या नावे होता. 'इस्रो'ने पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने हे उपग्रह अंतराळात सोडले होते. त्यानंतर 2018 मध्ये अमेरिकेतील सायग्नस मिशनमध्ये एकाच रॉकेटच्या सहाय्याने 108 सॅटेलाईट्स लाँच करण्यात आले होते. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' या कंपनीने रविवारी एकाच रॉकेटच्या सहाय्याने तब्बल 143 छोटे सॅटेलाईट्स अंतराळात सोडण्याचा नवा विक्रम केला आहे.
खर्चात बचत करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. ती जणू काही एखाद्या कॅबमध्ये राईड शेअर करण्यासारखीच होती. या मोहिमेला 'ट्रान्स्पोर्टर-1' असे नाव देण्यात आले होते. फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हरल स्पेस फोर्स स्टेशनवरून टू स्टेज फाल्कन-9 रॉकेटच्या सहाय्याने हे उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले. 'स्पेस एक्स'ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे की, 'फाल्कन-9' हे रॉकेट 143 सॅटेलाईट घेऊन आपल्या कक्षेत जाऊन पोहोचले आहे. एकाच खेपेत इतक्या मोठ्या संख्येने सॅटेलाईट अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याबरोबरच स्पेस एक्सचे पहिले स्मॉलसॅट राईडशेअर प्रोग्रॅम मिशन पूर्ण झाले. यामध्ये छोट्या सॅटेलाईट कंपन्यांना कमी किमतीत त्यांचे सॅटेलाईट अंतराळात सोडण्याची सोय केली जाते. 200 किलो वजनाच्या सॅटेलाईटला अंतराळात पाठवण्यासाठी सुमारे 73 लाख रुपयांपासून सुरुवात होते. रविवारी पाठवण्यात आलेल्या सॅटेलाईट्समध्ये अमेरिका आणि जर्मनीच्या 48 अर्थ इमेजिंग सॅटेलाईट, 17 कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि 30 छोट्या सॅटेलाईट्सचा समावेश आहे. 'फाल्कन-9'ने एखाद्या शू बॉक्सच्या आकाराच्या क्यूबसेट्स आणि अतिशय जड मायक्रो सॅटेलाईटलाही कक्षेत पोहोचवले. स्पेसएक्सचा आधीचा विक्रम 64 सॅटेलाईट्सचा आहे. डिसेंबर 2018 मध्ये ही मोहीम झाली होती.