Moon Mystery : चंद्रावरील साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या महाविस्फोटाचा उलगडा

दुर्मीळ उल्कापातामुळे शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे
Moon Mystery
चंद्रावरील साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या महाविस्फोटाचा उलगडा Vanessa Jewell
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पृथ्वीवर पडलेल्या एका दुर्मीळ चांद्र उल्केने अंतराळ विज्ञानात एक खळबळजनक खुलासा केला आहे. तब्बल ३.५ (साडेतीन) अब्ज वर्षांपूर्वी चंद्रावर झालेल्या एका अज्ञात आणि भीषण ‘आघात घटनेचा’ पुरावा या उल्केमध्ये सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ज्या काळात पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात होत होती, नेमक्या त्याच काळात आपली सूर्यमाला कशी बदलत होती, यावर या संशोधनामुळे नवा प्रकाश पडला आहे.

‘जिओलॉजी’ या प्रसिद्ध नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वायव्य आफ्रिकेत सापडलेल्या ‘NWA 12593’ नावाच्या चांद्र उल्केचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना त्यावर चंद्रावर झालेल्या तीन वेगवेगळ्या कालखंडांतील आघातांच्या खुणा सापडल्या. यातील सर्वात पहिल्या आणि प्राचीन आघातावर संशोधकांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. या अभ्यासाच्या मुख्य लेखिका आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर’ येथील ग्रह शास्त्रज्ञ कॅरोलिन क्रो यांनी सांगितले की, ‘पृथ्वीवर जीवसृष्टीचे पहिले जीवाश्म पुरावे साधारणत: ३.५ अब्ज वर्षांपूर्वीचे आढळतात, याचा अर्थ त्याआधीपासूनच इथे जीवनाचा उगम आणि विकास होत होता. मग प्रश्न असा पडतो की, जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी आकार घेत होती, तेव्हा आपल्या सूर्यमालेत कशा प्रकारचे आघात किंवा उलथापालथ सुरू होती? जीवसृष्टी इथे कशी टिकून राहिली हे समजून घेण्यासाठी या विनाशकारी घटनांचा घटनाक्रम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

’ संशोधकांनी या उल्केचे वय आणि कालखंड निश्चित करण्यासाठी ‘रेडिओमेट्रिक डेटिंग’ या अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला. यातून असे समोर आले की, हा पहिला मोठा आघात ३.५ अब्ज वर्षांपूर्वी झाला होता, म्हणजेच आपली सूर्यमाला तयार झाल्यानंतर साधारणत: १ अब्ज वर्षांनी ही घटना घडली होती. या उल्केमध्ये ‘क्युबिक झिरकोनिया’ हा खनिज पदार्थ सापडला आहे, जो पृथ्वीवर हुबेहूब हिऱ्यासारखा दिसण्यासाठी ओळखला जातो. मात्र, चंद्रावरून आलेल्या या प्राचीन उल्केमध्ये या खनिजाने एक वेगळीच कहाणी सांगितली.

‘क्युबिक झिरकोनिया’ केवळ अत्यंत उच्च तापमानातच तयार होऊ शकतो. याचा अर्थ या भीषण आघातामुळे चंद्राचा पृष्ठभाग प्रचंड तापून वितळला होता. चंद्रावरील कमालीच्या थंड वातावरणामुळे मूळ खनिज नष्ट झाले असले, तरी त्याच्या पुनर्रचना झालेल्या अवशेषांवरून शास्त्रज्ञांनी या महाविस्फोटाचा शोध लावला. विशेष म्हणजे, याच कालखंडात केवळ चंद्रावरच नव्हे, तर पृथ्वीवर आणि अंतराळातील ‘वेस्टा’ नावाच्या एका महाकाय अशनीवरही असेच प्रचंड आघात झाले होते, याचे पुरावे इतर स्वतंत्र संशोधनातून मिळाले आहेत. इतक्या अब्जावधी वर्षांपूर्वी वेगवेगळ्या तीन खगोलीय वस्तूंवर झालेल्या आघातांचे पुरावे मिळणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते; कारण काळाच्या ओघात होणारी झीज आणि इतर भौगोलिक बदलांमुळे हे पुरावे नष्ट होतात. मात्र, या चांद्र उल्केने सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील अनेक रहस्ये शास्त्रज्ञांसमोर खुली केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news