

लास वेगास : येथे सादर होणार्या भव्य शोमुळे जागतिक मनोरंजन क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे. वॉशिंग्टन राज्यातील चाहती डॅनिएल रेनी हिने अलीकडेच या ठिकाणी बॅक स्ट्रिट बॉईजचा शो पाहिला आणि ती अक्षरशः थक्क झाली.
स्पिअरच्या प्रचंड घुमटाकार स्क्रीनवर लाखो तार्यांचे आकाश, अंतराळातील प्रवास आणि बँडची अवकाश यानातील सफर हे सर्व अत्याधुनिक ग्राफिक्समुळे सजीव वाटते. सुमारे 15,000 चौरस मीटर क्षेत्र व्यापणारी ही स्क्रीन प्रेक्षकांना पूर्णपणे वेगळ्या जगात घेऊन जाते. ‘असा अनुभव याआधी कधीच घेतला नव्हता,’ असे रेनीने सांगितले.
2023 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पावर तब्बल 2.3 अब्ज डॉलर खर्च झाला. येथे यु2 च्या कॉन्सर्टपासून ते विझार्ड ऑफ ओझच्या नव्या आवृत्तीपर्यंत विविध कार्यक्रम सादर झाले आहेत. सुरुवातीला या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते; मात्र 2025 मध्ये स्पिअरने 57.6 दशलक्ष डॉलर नफा कमावत यशाची नोंद केली. दरम्यान, अशाच प्रकारचे अनुभव देणार्या कॉस्म या कंपनीनेही अमेरिकेतील अनेक शहरांत घुमटाकार थिएटर्स उभारण्यास सुरुवात केली आहे. येथे प्रेक्षक द मेट्रीक्ससारखे चित्रपट किंवा थेट क्रीडा सामने अत्याधुनिक द़ृश्य प्रभावांसह अनुभवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, हा ‘इमर्सिव्ह एंटरटेनमेंट’ भविष्यातील दिशा दर्शवतो. मात्र, पूर्वी 3डी सिनेमासारख्या तंत्रज्ञानालाही मोठ्या अपेक्षा होत्या; पण ते सर्वसामान्यांमध्ये फारसे रुजले नाही. त्यामुळे स्पिअर आणि तत्सम प्रकल्पांचे दीर्घकालीन यश अजूनही चर्चेचा विषय आहे. तरीही, प्रेक्षकांना भुरळ घालण्याची क्षमता या घुमटाकार मनोरंजनस्थळांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. डॅनिएल रेनीसारखे अनेक चाहते पुन्हा हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि कदाचित, हेच या नव्या युगाचे खरे यश ठरू शकते.