Space illness risk | अंतराळातील आजारपणाच्या शक्यतेने चंद्र मोहिमांसमोर आव्हान

’आयएसएस’मधून एका अंतराळवीराला तातडीने आणले होते पृथ्वीवर
Space illness risk |
Space illness risk | अंतराळातील आजारपणाच्या शक्यतेने चंद्र मोहिमांसमोर आव्हान
Published on
Updated on

वॉशिंग्टन: नासा सध्या आपल्या ‘आर्टेमिस 2’ मोहिमेद्वारे चार अंतराळवीरांना चंद्राभोवती 10 दिवसांच्या प्रवासावर पाठवण्याच्या तयारीत आहे. मात्र, याच दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील एका अनुभवी अंतराळवीराला कक्षेमध्ये असताना उद्भवलेल्या अचानक आजारपणामुळे खोल अंतराळातील प्रवासातील एका मोठ्या जोखमीकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे, ते म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेची गरज.

नासाचे अंतराळवीर मायकेल फिंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असताना त्यांना अचानक एका आरोग्य समस्येचा सामना करावा लागला. या घटनेमुळे त्यांना बोलणे कठीण झाले होते. परिणामी, नासाला इतिहासात पहिल्यांदाच अंतराळ स्थानकातून वैद्यकीय स्थलांतर (चशवळलरश्र र्एींरर्लीरींळेप) करावे लागले. 7 जानेवारी 2026 ला अंतराळवीर फिंके हे स्पेस वॉकची तयारी करून रात्रीचे जेवण करत असताना ही घटना घडली. त्यांना कोणतीही वेदना जाणवली नाही; परंतु सुमारे 20 मिनिटे ते बोलू शकले नाहीत.

डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे; मात्र या आजाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‘हे सर्व अचानक घडले आणि अतिशय वेगवान होते. माझ्या सहकार्‍यांनी माझी अवस्था ओळखली आणि अवघ्या काही सेकंदांतच सर्वजण मदतीसाठी धावून आले,’ असे फिंके यांनी ‘असोसिएटेड प्रेस’शी बोलताना सांगितले. मायकेल फिंके हे ‘स्पेस-एक्स क्रू-11’ मोहिमेचे पायलट म्हणून अंतराळ स्थानकावर होते. सुदैवाने, ‘आयएसएस’ पृथ्वीच्या जवळ असल्याने फिंके आणि त्यांच्या सहकार्‍यांना तातडीने पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले. मात्र, चंद्रावरील मोहिमांच्या बाबतीत हे इतके सोपे नसेल.

आर्टेमिस मोहिमेत नासा चंद्रावर 20 अब्ज डॉलर्सचा तळ उभारण्याची आणि मानवी उपस्थिती कायम ठेवण्याची योजना आखत आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असल्याने, अशा अचानक उद्भवणार्‍या वैद्यकीय समस्यांवेळी अंतराळवीरांना तातडीने पृथ्वीवर आणणे कठीण जाऊ शकते. नासा आता अंतराळवीरांच्या जुन्या वैद्यकीय नोंदींची तपासणी करत आहे, जेणेकरून अंतराळात यापूर्वी कोणासोबत अशी घटना घडली आहे का, याचा शोध घेता येईल. फिंके यांच्या उपचारादरम्यान अंतराळ स्थानकावरील ‘अल्ट्रासाऊंड’ मशिनचा वापर करण्यात आला होता. या घटनेमुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि स्वायत्त आरोग्य व्यवस्था विकसित करणे अनिवार्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news