

सेऊल : कुणाचे भाग्य कधी व कसे उजळेल हे काही सांगता येत नाही. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अब्जाधीश होणं हे तर एखाद्या स्वप्नासारखं वाटू शकतं, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. दक्षिण कोरियाच्या किम जंग युन बाबत हे घडलंय. फोर्ब्सच्या २०२६ च्या ‘वर्ल्ड बिलेनियर’ यादीत किमचं नाव नोंदवलं गेलं आहे. जगातील सर्वात कमी वयाची महिला टेक अब्जाधीश म्हणून तिचं नाव सर्वात वर आहे. स्टार्टअप सुरू करून तिने एवढी मिळकत मिळवली नाहीये, तर वडिलांनी तयार केलेल्या ‘नेक्सॉन’ गेमिंग कंपनीतून तिला तिच्या वाट्याचा हिस्सा मिळाल्याने ती रातोरात अब्जाधीश झाली आहे.
फोर्ब्सच्या मते, २०२६ च्या लिस्टमध्ये किम जंग युनची नेटवर्थ सुमारे १.७ अब्ज डॉलर आहे. तिची संपत्ती १४ हजार कोटींची आहे. तिच्या संपत्तीचा मुख्य सोर्स ऑनलाईन गेमिंग आहे. फोर्ब्सच्या यादीत ती जगातील सर्वात कमी वयाची म्हणजे २२ व्या वर्षी अब्जाधीश झालेली तरुणी आहे. वयाच्या २० व्या वर्षी अब्जाधीश झाल्याचा विक्रम एमिली वायगट हिच्या नावे आहे. त्यामुळेच किमला जगातील सर्वात कमी वयाची टेक महिला अब्जाधीश म्हणणं अधिक योग्य ठरणार आहे. किम जंग युनचे वडील किम जंग जू यांनी १९९४ मध्ये नेक्सॉन कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीने ऑनलाईन गेमिंगच्या जगात मोठा बदल घडवून आणलेला आहे.
नेक्सॉनने MapleStory, KartRider आणि Dungeon & Fighter सारखे गेम तयार केले. हे गेम जगभरात प्रचंड लोकप्रिय आहेत. फोर्ब्सच्या मते, ही कंपनी ८० हून अधिक लाईव्ह गेम चालवते. ७२ हून अधिक देशात त्यांचे यूजर्स आहेत. किम जंग जू यांनी केवळ गेम बनवण्यावर लक्ष दिलं नाही. तर मोफत गेम खेळता येईल, असं ऑनलाईन गेमिंगचं एक असं मॉडल तयार केलं. नेक्सॉनला Free-to-Play मॉडलचा मोठा खिलाडी मानलं जात आहे. हेच मॉडल नंतर संपूर्ण गेमिंग इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय ठरलं आहे. किम जंग युनच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल २०२२ मध्ये आला. तिचे वडील किम जंग जू यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुली किम जंग मिन आणि किम जंग युन यांना कुटुंबाच्या कंपनीतील मोठा हिस्सा मिळाला. नेक्सॉनची सर्वात मोठी शेअर होल्डिंग कंपनी NXC मधून दोघींना सर्वाधिक हिस्सा मिळाला. फोर्ब्सच्या मते, दोन्ही बहिणींकडे NXC ची भागीदारी आहे. जपानच्या शेअर बाजारात NXC लिस्टेड आहे. किम जंग युनने यात आपली भागीदारी केवळ ९ टक्के असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच, किम जंग युनने नेक्सॉन स्वत: सुरू केली नाही आणि कंपनीचं कामकाजही ती रोज चालवत नाही. फोर्ब्सच्या मते, दोन्ही बहिणी नेक्सॉनच्या ऑपरेशनमध्ये सहभागी नाहीत. त्यांच्या खासगी आयुष्याबाबतची अत्यंत कमी माहिती सार्वजनिक आहे.