

सेऊल : दक्षिण कोरियाचा सैन्य अधिकारी ओ योहानने शारीरिक क्षमतेची सीमा ओलांडत एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने 24 तासांत तब्बल 11,707 पुलअप्स करून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. ओ योहानने दक्षिण कोरियातील इंचियोन येथे हा अविश्वसनीय पराक्रम केला, ज्याला आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने अधिकृत मान्यता दिली आहे.
अनेक वर्षांची कठोर मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ओ योहानने हे लक्ष्य गाठले. त्याने आपली ही कामगिरी त्याच्या सैन्य युनिटला समर्पित केली आहे, जिथे त्याला शिस्त आणि सामर्थ्याचे धडे मिळाले. या विक्रमातील एक विशेष गोष्ट म्हणजे, ओ योहान आणखी जास्त पुलअप्स करू शकला असता. मात्र, त्याने आपल्या विशेष सैन्य दलाच्या ‘707’ वी स्पेशल मिशन ग्रुप’ला मानवंदना देण्यासाठी जाणीवपूर्वक 11,707 या आकड्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे.