3,200 Year Old Blue Hole | दक्षिण चीन समुद्रात ३२०० वर्षे जुने ‘ब्ल्यू होल’

3,200 Year Old Blue Hole |
3,200 Year Old Blue Hole | दक्षिण चीन समुद्रात ३२०० वर्षे जुने ‘ब्ल्यू होल’
Published on
Updated on

बीजिंग : समुद्राच्या अथांग तळाशी अनेक रहस्ये दडलेली आहेत. काळाच्या ओघात ही रहस्ये आपल्यासमोर येतात आणि आपण थक्क होऊन जातो. आता दक्षिण चीन समुद्रात निसर्गाचा एक अत्यंत विस्मयकारक आणि अद्‌भूत चमत्कार शास्त्रज्ञांना आढळला आहे. समुद्रामध्ये एक असा महाकाय 'ब्लू होल' सापडला आहे, ज्याच्या आकारात चार बास्केटबॉल कोर्ट सहज सामावू शकतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी या होलच्या पाण्याची आणि मातीची प्रयोगशाळेत वैज्ञानिक तपासणी केली, तेव्हा तिथे २७०० हून अधिक नवीन आणि दुर्मीळ सागरी जीवांची एक संपूर्ण वेगळीच दुनिया नांदत असल्याचे उघड झाले. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लू होल सुमारे ३२०० वर्षे जुना आहे.

जगातील बहुतांश ब्लू होल हे हिमयुगात तयार झालेल्या कोरड्या गुहा पाण्याखाली बुडाल्यामुळे बनले आहेत. मात्र, दक्षिण चीन समुद्रात सापडलेला हा खड्डा पूर्णपणे वेगळा आहे. प्रवाळांच्या खडकांची नैसर्गिक वाढ आणि ते एकावर एक जमा होत गेल्याने या वैशिष्ट्यपूर्ण विवराची निर्मिती झाली आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक अंडरवॉटर रोबो, ड्रोन आणि पाणबुड्यांच्या मदतीने या जागेचे नमुने गोळा केले. प्रयोगशाळेत या पाण्यातील ई-डीएनए आणि मातीचे नमुने तपासले असता, एकाच ठिकाणी २७०० हून अधिक प्रजातींचे वास्तव्य आढळले. म्हणूनच शास्त्रज्ञ याला पृथ्वीच्या इतिहासाचे रहस्य उलगडणारा 'टाईम कॅप्सूल' मानत आहेत.

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या अहवालानुसार, हा ब्ल्यू होल ज्या भागात सापडला आहे, त्या 'स्कारबोरो शोल' क्षेत्रावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा वाद आहे. ही जागा फिलिपिन्सच्या किनारपट्टीपासून अवघ्या २३० किलोमीटर, तर चीनपासून ८७४ किलोमीटर अंतरावर आहे. चीन या भागाला आपला सांगत 'हुआंगयान द्वीप' म्हणतो, तर फिलिपिन्स यावर आपला हक्क सांगत 'पानाटाग शोल' असे नाव देतो. साल २०१२ च्या वादानंतर या भागावर चीनने प्रत्यक्ष ताबा मिळवला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये चीनने या परिसराला 'नेचर रिझर्व्ह' घोषित केले होते. जाणकारांच्या मते, वैज्ञानिक संशोधनाच्या आणि सागरी सुरक्षेच्या बहाण्याने चीन या वादग्रस्त भागावर आपली पकड अधिक मजबूत करत आहे आणि फिलिपिन्सच्या मच्छीमारांना तिथे येण्यापासून रोखत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news