

वॉशिंग्टन : सूर्यापासून अतिशय मोठ्या ऊर्जा लहरी निघतात. त्यांना सौर सुपरफ्लेअर म्हटले जाते. वैज्ञानिक आता अशा सौरवादळांबाबत किंवा सौरज्वाळांबाबत चिंतेत आहेत. यापूर्वी असे म्हटले जात होते की, या घटना सुमारे एक हजार वर्षांच्या कालावधीनंतर घडतात; मात्र अलीकडेच असे दिसून आले की, त्या नेहमी होऊ शकतात. अशा सौरवादळांमुळे पृथ्वीच्या कक्षेतील सॅटेलाईट, जीपीएस आणि पॉवर ग्रीडसारख्या उपकरणांवर परिणाम होऊ शकतो. एक मोठी सौरज्वाळा या उपकरणांचे काम बिघडवू शकते.
सौर ज्वाळा या ऊर्जेचा स्फोट असतात. हे सौरकण अंतराळात फेकले जातात व ते इतस्ततः विखुरले जातात. सामान्य सौरज्वाळा सहजपणे सामान्य अडथळे निर्माण करतात. त्यामध्ये रेडिओ सिग्नल्स किंवा जीपीएसमध्ये बिघाड यांचा समावेश होतो. मात्र, एखादी सौर सुपरफ्लेअर अधिक शक्तिशाली असते. नियमित फ्लेअरच्या तुलनेत तिच्यामधून लाखो पट अधिक ऊर्जा बाहेर पडते. हे सौरकण प्रकाशाच्या गतीने चालतात आणि पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काही मिनिटांचाच वेळ लागतो. छोट्या सौरज्वाळा अस्थायी समस्या निर्माण करतात. मात्र, एक सुपरफ्लेअर विनाशकारीही ठरू शकते. ती सॅटेलाईट पूर्णपणे नष्ट करते, पॉवर ग्रीड बंद पाडते आणि जगभरातील संचार प्रणालींच्या कामात बिघाड निर्माण करू शकते. ही हानी अनेक दिवस किंवा महिने राहू शकते. त्यामुळे दैनंदिन कामांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
वैज्ञानिकांना दीर्घकाळापासून असे वाटत होते की, अशा सुपरफ्लेयर एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक कालावधींनंतर निर्माण होतात. डॉ. वॅलेरी वसिलीव यांनी याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती याच महिन्यात ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी 50 हजारपेक्षा अधिक तार्यांच्या डेटाचा अभ्यास केला. या तार्यांमधून सुमारे शंभर वर्षांमधून एकदा सुपरफ्लेअर निघतात असे दिसून आले. हा शोध चिंताजनकच आहे. जर आपल्या ग्रहमालिकेचा तारा असलेल्या सूर्याबाबतही असेच घडत असेल, तर आधीच्या अनुमानापेक्षा अधिक सुपरफ्लेअर अनुभवण्यास येऊ शकतात.