Solar explosion radio wave disruption | सूर्यावरील महाविस्फोटामुळे पृथ्वीवर रेडिओ लहरी विस्कळीत

Solar explosion radio wave disruption  |
Solar explosion radio wave disruption | सूर्यावरील महाविस्फोटामुळे पृथ्वीवर रेडिओ लहरी विस्कळीत
Published on
Updated on

वॉशिंग्टन: सूर्यावर झालेल्या एका मोठ्या उद्रेकामुळे सूर्याच्या वातावरणात एक प्रचंड छिद्र पडले आहे. यामुळे पृथ्वीवरील रेडिओ दळणवळण तात्पुरते खंडित झाले असून, आकाशात विलोभनीय ‘उत्तर ध्रुवीय प्रकाश’ (नॉर्दन लाईटस्) दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेत नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (NOAA) स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरनुसार, शास्त्रज्ञांनी रविवारी (10 मे) सूर्यावर ‘M5.7’ श्रेणीतील सौर ज्वालांची नोंद केली. या ज्वालांमुळे पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यप्रकाश होता, त्या भागातील उच्च-फ्रिक्वेन्सी रेडिओ संपर्कात काही काळ व्यत्यय आला. सौर ज्वालांच्या तीव्रतेमध्ये ‘ M-क्लास’ हा ‘X-क्लास’ नंतरचा दुसरा सर्वात शक्तिशाली प्रकार मानला जातो. सौर ज्वाला म्हणजे सूर्यापासून बाहेर पडणारा विद्युत चुंबकीय लहरींचा अचानक झालेला मोठा स्फोट.

या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, त्यामुळे शास्त्रज्ञांना त्या दिसतात तोपर्यंत त्या पृथ्वीपर्यंत पोहोचलेल्या असतात. नासाच्या माहितीनुसार, पृथ्वीचे वातावरण आणि चुंबकीय क्षेत्र आपल्याला या हानिकारक किरणोत्सर्गापासून वाचवते. मात्र, यामुळे वरच्या वातावरणातून प्रवास करणार्‍या रेडिओ लहरी, सॅटेलाईट आणि अंतराळयानांच्या कामात अडथळा येऊ शकतो. या उद्रेकामुळे ‘कोरोनल मास इजेक्शन’ (CME) देखील निर्माण झाले आहे. हा सौर प्लाझ्मा आणि किरणोत्सर्गाचा एक संथ गतीने चालणारा ढग असतो. यामुळे भू-चुंबकीय वादळे आणि अरोरा (ध्रुवीय प्रकाश) निर्माण होऊ शकतात.

स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा ढग थेट पृथ्वीवर आदळण्याची खात्री नसली, तरी त्याचा थोडा भाग पृथ्वीला स्पर्श करून जाण्याची शक्यता आहे. सूर्य सध्या आपल्या 11 वर्षांच्या चक्रातील अत्यंत सक्रिय टप्प्यातून (सोलर मॅक्झिमम) जात आहे. हा सक्रियतेचा उच्चांक 2025 च्या सुरुवातीला संपल्याचा अंदाज असला, तरी अजूनही सौर क्रिया पूर्णपणे कमी झालेली नाही. शास्त्रज्ञांच्या मते, सौर मॅक्झिममच्या काळात अशा प्रकारच्या ज्वाला आणि ‘CME’ येणे सामान्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news