

सानुक (येमेन) : अथांग समुद्राच्या कुशीत वसलेला आणि जगापासून हजारो वर्षे अलिप्त राहिलेला 'सोकोत्रा द्वीपसमूह' सध्या आपल्या अद्भूत जैवविविधतेमुळे जागतिक स्तरावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. येमेन देशाच्या मालकीचा हा द्वीपसमूह चार बेटे आणि दोन खडकाळ लहान बेटांचा समूह आहे. येथील थक्क करणाऱ्या आणि जगाच्या पाठीवर इतर कुठेही न आढळणाऱ्या शेकडो वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींमुळे याला 'हिंदी महासागराचे गॅलापागोस" म्हणून ओळखले जाते.
अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेला सुमारे २५० मैल (४०० किलोमीटर) आणि 'हॉर्न ऑफ आफ्रिका'च्या पूर्वेला १४० मैल (२२० किमी) अंतरावर हा द्वीपसमूह स्थित आहे. येथे साधारण ६०,००० लोकांची वस्ती आहे. दुर्गमतेमुळे २०२३ पर्यंत पर्यटकांसाठी येथे पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी येथून सुटणारे एकमेव साप्ताहिक विमान होते. विशेष म्हणजे, याचे बुकिंग थेट व्हॉटस्ॲपद्वारे करावे लागत असे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता ही विमानसेवा अनेकदा रद्दही केली जात असे. या द्वीपसमूहात 'सोकोत्रा' नावाचे एक मुख्य बेट आहे, ज्याने एकूण भूभागाचा ९५ टक्के हिस्सा व्यापला आहे.
या मुख्य बेटावर बर्फासारखे पांढरेशुभ्र वाळूचे ढिगारे, मध्यवर्ती डोंगराळ रांगा आणि चुनखडीची पठारे आहेत. या पठारांवर दुष्काळातही तग धरून राहणारी 'कुकंम्बर ट्री' (काकडीचे झाड - Dendrosicyos socotranus) आणि छत्र्यांच्या आकाराची 'ड्रॅगन्स ब्लड ट्री' (Dragon's Blood Tree - Dracaena cinnabari) ही वैशिष्ट्यपूर्ण झाडे पाहायला मिळतात. ही झाडे पृथ्वीवर इतर कुठेही अस्तित्वात नाहीत. 'ड्रॅगन्स ब्लड ट्री'ला हे नाव त्यातून निघणाऱ्या गडद लाल रंगाच्या डिंकामुळे मिळाले आहे, ज्याचा वापर नैसर्गिक औषधे आणि रंगद्रव्य म्हणून केला जातो.
सुमारे ३ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा अरबस्तान आणि आफ्रिकेचे भूभाग एकमेकांपासून वेगळे झाले, तेव्हा सोकोत्रा हा एक उरलेला तुकडा म्हणून मागे राहिला. या विभाजनामुळे तांबडा समुद्र आणि एडनचे आखात निर्माण झाले, जे तांबड्या समुद्राला अरबी समुद्राशी जोडते. किमान १५ दशलक्ष (१.५ कोटी) वर्षांपासून जगापासून पूर्णपणे वेगळे राहिल्यामुळे येथील प्राणी आणि वनस्पतींचा विकास एका वेगळ्याच पद्धतीने झाला आहे. याच अद्वितीय आणि दुर्मीळ वैशिष्ट्यांमुळे २००८ मध्ये 'युनेस्को'ने सोकोत्राला 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केले आहे.