

रिओ दि जानेरिओ : ब्राझीलमध्ये सोशल मीडिया कंपन्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. यूजर्स जर एखादा आक्षेपार्ह मजकूर अर्थात कंटेंट पोस्ट केला तर त्याची जबाबदारी संबंधित सोशल मीडिया कंपनीवर राहणार आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे.
या निकालानुसार, गुगल, मेटा आणि टिकटॉक सारख्या मोठ्या कंपन्यांना आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांनी (युजर्स) पोस्ट केलेल्या कंटेंटसाठी जबाबदार धरले जाणार आहे. न्यायालयाच्या मते, आक्षेपार्ह कंटेंटबद्दल तक्रार आल्यास संबंधित सोशल मीडिया कंपन्यांना तातडीने कारवाई करावी लागेल, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
ब्राझीलमधील सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 8-3 अशा बहुमताने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आता सोशल मीडियावर वापरकर्ते जे काही पोस्ट करतील, त्याची थेट जबाबदारी संबंधित सोशल मीडिया कंपनीची असेल. पीडित व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर कंपनीला तो आक्षेपार्ह कंटेंट आपल्या प्लॅटफॉर्मवरून तत्काळ हटवावा लागेल. या निर्णयामुळे सोशल मीडिया कंपन्यांना आपल्या कंटेंट मॉडरेशन धोरणांमध्ये मोठे बदल करावे लागतील, असे मानले जात आहे.