

सिडनी : टिकटॉक, फेसबुक आणि इंस्टाग््राामवर सध्या ‘बुश लिजेंड’ नावाच्या एका व्यक्तिमत्त्वाची प्रचंड चर्चा आहे. कधी अंगाला गेरू फासलेला, तर कधी खाकी कपड्यांमधील हा आदिवासी तरुण प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियातील विविध प्राण्यांची माहिती देतो. पार्श्वभूमीला वाजत असलेले दिजेरिडूचे संगीत आणि त्या तरुणाचा उत्साह पाहून हजारो लोक त्याचे चाहते बनले आहेत. मात्र, धक्कादायक वास्तव हे आहे की, हा माणूस अस्तित्वातच नाही; तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे तयार करण्यात आलेला एक ‘डिजिटल अवतार’ आहे.
हे छोटे व्हिडीओ अतिशय आकर्षक पद्धतीने बनवले जातात. यामध्ये दिसणारा तरुण प्राण्यांशी संवाद साधताना आणि माहिती देताना दिसतो. अनेक युजर्सनी कमेंटस्मध्ये म्हटले आहे की, त्याला स्वतःचा टीव्ही शो असायला हवा. मात्र, हे सर्व व्हिडीओ पूर्णपणे कृत्रिम आहेत. या चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जरी हा भाग ‘एआय’ असल्याचे नमूद केले असले, तरी सामान्य युजर्स अनेकदा प्रोफाईल चेक न करताच याला खरे मानतात.
तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार मूळनिवासी लोकांच्या संस्कृतीची आणि ज्ञानाची एक प्रकारची ‘सांस्कृतिक चोरी’ आहे. कोणत्याही समुदायाची परवानगी न घेता किंवा त्यांच्याशी संबंध न ठेवता तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची प्रतिमा वापरली जात आहे. यामुळे मूळनिवासी समुदायांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही व्हिडीओंवर एआय वॉटरमार्क आहेत, तर काहींच्या कॅप्शनमध्ये तसा उल्लेख आहे. तरीही, अनेक प्रेक्षक यापासून अनभिज्ञ आहेत. फेसबुकवर एका युजरने लिहिले, ‘तुमची ऊर्जा अगदी स्टीव्ह इरविनसारखी आहे आणि तुमचा आवाज ऐकायला खूप छान वाटतो.’ परंतु, प्रत्यक्षात तो आवाज आणि ती ऊर्जा दोन्ही बनावट आहेत.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या व्हिडीओंखाली येणाऱ्या कमेंटस्. या एआय व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करताना अनेक लोक खऱ्या मूळनिवासी समुदायाबद्दल अपमानास्पद आणि वांशिक टिपणी करत आहेत. यामुळे खऱ्या आदिवासी समुदायांच्या भावना दुखावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बुश लिजेंड’चा निर्माता न्यूझीलंड मधील आहे. याचा अर्थ, ज्या ऑस्ट्रेलियन आदिवासी संस्कृतीची प्रतिमा वापरली जात आहे, त्या समुदायाशी निर्मात्याचा कोणताही थेट संबंध नाही.