

लंडन : आतापर्यंत सापांना असे जीव मानले जात होते, जे केवळ त्यांच्या नैसगिर्र्क प्रवृत्तीनुसार किंवा सवयीनुसार वागतात. ते काहीही नवीन शिकू शकत नाहीत किंवा कोणतीही गोष्ट लक्षात ठेवू शकत नाहीत, असा एक समज होता. मात्र, अलीकडील संशोधनाने या समजाला पूर्णपणे छेद दिला असून, सापांच्या बुद्धिमत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सापांमध्येही चांगली स्मरणशक्ती असल्याचे दिसून आले आहे.
प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे की, साप अनुभवातून शिकतात आणि वारंवार सराव केल्यास त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करू लागतात. संशोधनानुसार, साप विशिष्ट ठिकाणे लक्षात ठेवू शकतात, जसे की अन्न कोठे मिळेल, सुरक्षित निवारा कोणता आणि धोक्याचा भाग कोणता. अनेक प्रजाती दरवर्षी त्याच जुन्या ठिकाणी परततात, जिथे त्यांना अन्न आणि सुरक्षा मिळाली होती. सापांची ही मजबूत स्मरणशक्ती त्यांना निसर्गात टिकून राहण्यास मदत करते. शास्त्रज्ञांच्या मते, जुन्या प्रयोगांमध्ये सापांना कमी बुद्धिमान मानले गेले.
कारण त्यांच्या चाचण्या सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या मानसिकतेवर आधारित होत्या. जेव्हा शास्त्रज्ञांनी सापांच्या नैसर्गिक जीवनशैलीनुसार प्रयोग केले, तेव्हा धक्कादायक निकाल हाती आले. ‘कॉर्न स्नेक्स’वर केलेल्या एका अभ्यासात असे दिसले की, अवघ्या काही दिवसांत ते सुरक्षित जागा शोधण्यात पटाईत झाले. यावरून हे सिद्ध झाले की ते केवळ शिकतच नाहीत, तर माहिती साठवूनही ठेवतात. संशोधनात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे, सर्व सापांचा स्वभाव एकसारखा नसतो. काही साप खूप हिंमतवान असतात, तर काही अत्यंत सतर्क असतात. सामाजिक स्तरावर, साप आपल्या सोबत्याच्या वर्तनानुसार स्वतःमध्ये बदल करतात. ते केवळ परिस्थितीला प्रतिक्रिया देत नाहीत, तर विचारपूर्वक निर्णय घेतात.