

लंडन : लहान मुलांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या हातात खुळखुळा दिलेला असतो. त्याचा आवाज त्यांना मजेशीर वाटतो. असाच आवाज काढणारा एक साप आहे. त्याला ‘रॅटलस्नेक’ असे म्हटले जाते. त्याच्या शेपटीवर असाच खुळखुळ्यासारखा आवाज काढणारी रचना असते. हा साप अतिशय जहाल विषारी व आक्रमकही असतो.
या सापाचं विष माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहे. जर वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर बाधित व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. विशेष म्हणजे, हा साप अंधारातही आपल्या शिकारावर हल्ला करू शकतो. रॅटलस्नेक आपल्या शेपटीने आवाज काढतो कारण त्याच्या शेपटीच्या टोकाला असलेल्या विशेष, जोडलेल्या खवल्या एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे खुळखुळ्यासारखा आवाज येतो.
या खवल्या केराटिनपासून बनवलेल्या असतात, ज्याचा वापर मानवी केस आणि नखांसाठीही होतो. जेव्हा रॅटलस्नेक आपल्या शेपटीत कंपन करतो, तेव्हा खवल्या एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे आवाज येतो. हा आवाज संभाव्य भक्षकांना सावध करतो किंवा शत्रूला दूर ठेवतो. अहवालानुसार, सापाच्या शेपटीच्या स्नायू प्रति सेकंद 90 वेळा हलू शकतात, ज्यामुळे हा आवाज निर्माण होतो. रॅटलस्नेक शिकारींना इशारा देण्यासाठी हा आवाज काढतात. रॅटलस्नेकचं विष माणसांसाठी अत्यंत घातक आहे.
अमेरिकेत सर्वात विषारी विष ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेकचं आहे. रॅटलस्नेकचं विष सायटोटॉक्सिक आहे. काही रॅटलस्नेकच्या विषात न्यूरोटॉक्सिक गुणधर्मही असतात. जर बाधित व्यक्तीला वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळणारा हा साप पक्षी आणि उंदरासारख्या छोट्या प्राण्यांची शिकार करतो. रॅटलस्नेकला जगातील सर्वात अलीकडील विकसित साप मानले जाते.