

बीजिंग : चीनच्या नानजिंग शहरातील मेट्रोचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मेट्रोच्या डब्यात अचानक मोठ्या संख्येने ‘साप’ जमिनीवर वळवळताना दिसत असल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडीओ पाहताना मेट्रोमध्ये सापांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे वाटते. मात्र, प्रत्यक्षात या घटनेमागचे सत्य काहीसे वेगळेच आहे. व्हिडीओमध्ये मेट्रोच्या डब्याच्या जमिनीवर अनेक लांबट, सापासारखे जीव वळवळताना दिसतात. हे दृश्य पाहून सुरुवातीला प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र, काही वेळातच हा प्रकार नेमका काय आहे हे स्पष्ट झाले. हे साप नव्हते, तर चिखलात आणि भातशेतीच्या परिसरात आढळणारे ईल मासे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे ईल काही बादल्यांमध्ये भरून मेट्रोत आणले जात होते. प्रवासादरम्यान बादल्या उलटल्याने त्यातील ईल मेट्रोच्या फ्लोअरवर पसरले आणि सापांसारखे वळवळू लागले. सुरुवातीची भीती दूर झाल्यानंतर काही प्रवाशांनीही परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. त्यांनी जमिनीवर पसरलेल्या ईलना हाताने गोळा करून पुन्हा बादल्यांमध्ये भरले. काही प्रवासी तर चक्क जमिनीवर बसून हे जीव गोळा करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्येही त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अनेकांनी सुरुवातीला व्हिडीओ पाहून मेट्रोमध्ये खरोखरच साप शिरल्याचा अंदाज व्यक्त केला, तर सत्य समोर आल्यानंतर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. ईल हा लांबट आणि सापासारखा दिसणारा मासा आहे. त्याचे शरीर गुळगुळीत आणि बऱ्यापैकी लवचिक असल्याने तो पाहताना अनेकदा साप असल्याचा गैरसमज होऊ शकतो. हे जीव प्रामुख्याने पाणथळ भाग, भातशेती, तलाव आणि दलदलीच्या परिसरात आढळतात. आशियातील अनेक भागांमध्ये ईलचे व्यावसायिक पद्धतीने पालन केले जाते आणि त्यांचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे मेट्रोत दिसलेला हा प्रकार सापांच्या हल्ल्याचा नसून, वाहतुकीदरम्यान बादल्या उलटल्यामुळे घडलेली अनपेक्षित घटना असल्याचे स्पष्ट झाले.