

बीजिंग : विज्ञानाच्या जगात निसर्गाकडून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारी शोध लावले जातात. नुकतेच चीनमधील शास्त्रज्ञांनी सापांच्या उष्णता शोधण्याच्या क्षमतेचा (Heat- sensing) आधार घेऊन एक अत्याधुनिक आर्टिफिशिअल इमेजिंग सिस्टम विकसित केली आहे. हा जगातील असा पहिलाच सेन्सर आहे जो पूर्ण अंधारातही ‘4के रिझोल्यूशन’ (3,840 बाय 2,160 पिक्सेल्स) मध्ये इन्फ्रारेड (IR) फोटो घेऊ शकतो. विशेष म्हणजे, याची गुणवत्ता आयफोन 17 प्रो (iPhone 17 Pro) च्या कॅमेर्याशी बरोबरी करणारी आहे.
निसर्गात ‘पिट वायपर्स’ सारख्या काही सापांच्या प्रजातींकडे त्यांच्या नाकाच्या जवळ ‘पिट ऑर्गन’ नावाचे एक विशेष अंग असते. हे अंग त्यांना अंधारातही भक्ष्याकडून उत्सर्जित होणारी उष्णता (इन्फ्रारेड लहरी) पाहण्यास मदत करते. मानवी डोळे फक्त द़ृश्य प्रकाश पाहू शकतात; परंतु साप लांब पल्ल्याच्या इन्फ्रारेड लहरींना ओळखू शकतात. याच संकल्पनेचा वापर ‘बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी आपले नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केला आहे. निसर्गात ज्या वस्तूचे तापमान उणे 273 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते, त्यातून इन्फ्रारेड लहरी बाहेर पडतात.
शास्त्रज्ञांनी या लहरी टिपण्यासाठी एका 8 इंची डिस्कवर विविध थरांची मांडणी केली आहे: 1.क्वांटम डॉटस् लेयर: यात मर्क्युरी आणि टेल्युरियमपासून बनलेले सूक्ष्म कण आहेत, जे इन्फ्रारेड लहरी शोषून घेतल्यावर विद्युत प्रभार तयार करतात. 2.अपकन्व्हर्टर (LED) लेयर: हे विद्युत प्रभार एका विशिष्ट लेयरमधून जातात, जिथे त्यांचे रूपांतर हिरव्या द़ृश्य प्रकाशामध्ये केले जाते. 3.CMOS सेन्सर: अखेरीस हा प्रकाश एका सेन्सरद्वारे हाय-रिझोल्यूशन प्रतिमेत रूपांतरित होतो.
या नवीन सिस्टीमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे उपकरण ’सामान्य तापमानाला’ (Room Temperature) काम करू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर इन्फ्रारेड सिस्टिम्सना उष्णतेमुळे येणारा अडथळा (Noise) टाळण्यासाठी अत्यंत खर्चिक अशा ’क्रायोजेनिक कूलिंग’ची (अतिशय थंड वातावरण) गरज असते. मात्र, चिनी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानात सर्व लेयर्स एकावर एक असल्याने सिग्नलची हानी होत नाही आणि कूलिंगची गरज भासत नाही. हे संशोधन 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध ’नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात संरक्षण क्षेत्र, वैद्यकीय तपासणी आणि रात्रीच्या वेळी केल्या जाणार्या फोटोग्राफीमध्ये मोठी क्रांती घडवून आणू शकते.