

नवी दिल्ली : निसर्गात असलेला प्रत्येक जीव आपल्या वेगळेपणामुळे ओळखला जातो. म्हणजे काही प्राणी त्यांच्या वजनामुळे, उंचीमुळे तर काही जण अगदी आपल्या सवयीमुळे ओळखले जातात. असाच एक प्राणी जो सहज आपल्याला दिसतो; पण तो तब्बल 3 वर्ष न खातापिता राहतो याची कुणालाच कल्पना नाही. हा जीव म्हणजे गोगलगाय!
तुम्ही अशा अनेक प्राण्यांबद्दल ऐकले असेल जे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांविषयी ओळखले जातात. आज आपण अशाच या जीवाविषयी जाणून घेऊ जो काहीही खाल्ल्या-पिल्याशिवाय 3 वर्षे झोपतो आणि जिवंत राहतो. गोगलगाय इतकी वर्षे झोपते यामागे विशिष्ट कारण असते. जेव्हा हवामान खूप उष्ण आणि कोरडे होते तेव्हा हे जीव स्वतःला वाचवण्यासाठी झोपेच्या प्रक्रियेत जातात. निद्रा ही एक प्रकारची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये जीव त्यांची ऊर्जा वाचवण्यासाठी गाढ झोपेत जातात. गोगलगाय स्वतःला तिच्या कवचात म्हणजेच शंखात लपून गाढ झोपेत जाते. जेव्हा दमट, ओलसर ऋतू येतो तेव्हा ती कवचातून बाहेर पडते. शंखातून परत आल्यावर ती तिचे सामान्य जीवन जगू लागते.