

वॉशिंग्टन : 25 एप्रिलच्या पहाटे जर तुम्ही आकाशाकडे पाहिलं, तर ते तुमच्याकडे पाहत हसताना दिसू शकतं, असे ‘नासा’च्या आकाशनिरीक्षकांनी सांगितले आहे. या दिवशी एक दुर्मीळ खगोलीय घटना, ट्रिपल कंजंक्शन, म्हणजेच तीन ग्रहांची एकत्रित रचना घडणार आहे. शुक्रवार, 25 एप्रिलच्या पहाटे शुक्र, शनी आणि अर्धचंद्र एकमेकांच्या अतिशय जवळ येणार असून, हे तीन आकाशीय घटक त्रिकोणाच्या आकारात उभे राहतील, ज्यामुळे हे द़ृश्य ‘स्मायली फेस’सारखं दिसेल.
‘नासा’च्या म्हणण्यानुसार, हे अनोखं द़ृश्य सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजाजवळ पाहायला मिळेल. शुक्र आणि शनी हे दोन्ही ग्रह अत्यंत तेजस्वी असल्यामुळे ते नुसत्या डोळ्यांनी सहज दिसू शकतात. मात्र, अधिक तपशील पाहायचा असेल तर दुर्बीण किंवा टेलिस्कोप वापरावा, असं सूचित करण्यात आले आहे. स्वच्छ वातावरण असेल, तर या त्रिकुटाखाली बुध ग्रहदेखील दिसू शकतो. मात्र, तो आकाशात खूपच खाली असल्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून दिसेलच असं नाही. खगोलशास्त्रात ‘कंजंक्शन’ म्हणजे दोन किंवा अधिक ग्रहांचे आकाशात जवळ येणं, आणि तीन ग्रह एकत्र आल्यावर त्याला ‘ट्रिपल कंजंक्शन’ असे म्हटले जाते. नासाच्या सोलर सिस्टीम अॅम्बेसडर ब्रेंडा कुल्बर्टसन यांनी कॅन्ससच्या स्थानिक टीव्ही चॅनलला सांगितलं, ‘शुक्र हा पूर्व क्षितिजाच्या थोडा वर, शनी त्याच्या खाली आणि अर्धचंद्र आणखी थोडा खाली व थोडा उत्तरेला असेल. अर्धचंद्र चंद्र हा हसर्यासारखा दिसतो. काही लोकांना हे तिन्ही एकत्रित पाहिल्यावर ते ‘स्मायली फेस’सारखं वाटू शकतं.’